Our Feeds

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

अश्वत्थामा...


ज मी, मृणाल आणि निनाद (मृणालचा मामेभाऊ) जंगलात फिरायला गेलो. गावाच्या जवळच जंगल. तिघांनाही जंगलात भटकंतीची आवड आहे. त्यात आज रविवार. छान धपाटे, कांदा, चटणी सोबत घेऊन निघालो आम्ही जीप घेऊन..

जंगल खूपच मोठा आहे. जवळपास दोनशे एक किलोमीटर पसरलेला. आज आम्ही ठरवले, दरवेळेस पेक्षा वेगळा मार्ग धरून पुढे जायचे. जाताना मोर, हरीण, कोल्हे आम्हाला दिसत होते. निनाद सगळ्यांचे छान छान फोटो काढत होता. इतक्यात मृणाल जोरात ओरडली... "बाबा"....!!

मी दचकलो आणि ब्रेक लावला.. बघितले तर एक मनुष्य झाडाखाली बसलेले. दाढी पोटापर्यंत वाढलेली. मस्तकावर वस्त्र गुंडाळलेलं. साधू सारखे दिसत होते. पण चेहऱ्यावर प्रचंड तेज.. मी त्यांना नमस्कार केला.. पाठोपाठ मृणाल आणि निनादने घाबरत नमस्कार केला. "बाबा, तुम्ही कसे काय इथे, इतक्या दाट जंगलात"

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

(ते स्मित करत) "हा प्रवास कधीही न संपणारा आहे. तसे तर प्रत्येकाचा प्रवास न संपणारा. पण माझ्याबाबतीत जरा वेगळंच. तुम्ही सगळे ज्या गोष्टीच्या मागे लागत असता. खरं तर ते शाप आहे. ते मी भोगत आहे.."

"शाप, कोणता शाप?"
"अमरतेचा शाप"
"अमरतेचा ??"
" हो, तू भेटत आहेस द्रोणाचार्य पुत्र, कर्णाचा मित्र अश्वत्थामाला..."

" गुरुदेव", असे म्हणत मी त्यांच्या पायावर आपले डोके ठेवले..
"उठ रे.." म्हणत उघळलेला चंदन स्वतःच्या डोक्याला लावला त्यांनी..
"माझे भाग्य, मला तुमचे दर्शन झाले गुरुदेव. नक्कीच मी कोणते तरी पुण्य केले होते मागच्या जन्मी"
"पुण्य नाही रे ऋणानुबंध आहे हे. कसं ते नाही सांगता येणार"
" गुरुजी. मृत्यूला लोकं इतके घाबरतात. तुम्हाला अमरतेचा वरदान. तरीही तुम्ही त्याला श्राप म्हणता ?"

"बाल्यावस्था, तारुण्य आणि वृद्धावस्था, हे तिन्ही अवस्था तुम्ही लाखो वेळेस उपभोगता आणि त्यातच जीवनाचा खरा आनंद मानता. वृद्धावस्थेनंतर पुन्हा बालपण. तू तोच असतो. फक्त शरीर दुसरा. काळ दुसरा. कर्तव्य दुसरे आणि आयुष्याचे ध्येय ही वेगळे. पाप पुण्याचा हिशोब हा तर लाखो वर्ष तुझ्या सोबत चालतो. काही कर्माचे फळ लगेच काहींना कैक वर्ष, किती तरी जन्म लागतात. आणि जर अमरतेचा वरदान मिळाला तर कोणते कर्तव्य आणि कसले ध्येय. स्मृतीही पाठ सोडत नाही.. ते सगळ्यात त्रासदायक.."

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

"गुरुजी, महाभारतबद्दल काही सांगा की"

"काय सांगू ? महाभारत तुला एकच माहितीय. असे महाभारत अनेक वेळेस झाले आणि आजही होतात. आपल्या अवती-भवती पहा, तुला अर्जुनही दिसेल. पक्षाच्या डोळ्याकडे नेम धरून पहात असलेला.. दुर्योधनही दिसेल.. छळकपट करणारा.. कर्णही दिसेल मैत्रीसाठी जीव देणारा.. आणि कृष्णही दिसेल मार्ग दाखवणारा.. महाभारत रोजच आहे.. रोजच वस्त्रहरण आहे आणि भर सभेत मान खाली घालणारे भीष्म, द्रोणाचार्यही आहेत.."

"गुरुजी, त्रास होत आहे का.. चंदन लावत आहात कपाळावर.. मी काही करू शकतो का तुमच्यासाठी ?"

(स्मित करत).. "आज बाराशे वर्षाने आपण भेटत आहोत... पुन्हा भेटु.. ऋणानुबंध आहे.. भेट होतंच राहणार"
अश्वत्थामा जात होते.. मी विस्फुरलेल्या डोळ्यांनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो.. आणि मृणाल, निनाद मला प्रचंड प्रश्न विचारत होते.. मी मात्र स्तब्ध होतो..

- सुहास कुलकर्णी 
(रायपूर, छत्तीसगड)


(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)
.

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »