घोडेगावात ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १७ तर सदस्यपदासाठी ७४ उमेदवार रिंगणात


अहमदनगर । DNA LIVE24 - नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वाच्या असलेल्या घोडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान होण्यासाठी मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर सदस्य पदासाठी ७४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत शनिवार  दिनांक १५ सप्टेंबर आहे. यंदा सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार आहे. सत्ताधारी, विरोधक आणि आमदार मुरकुटे प्रणित तिसरी आघाडी, अशा तीन प्रमुख पॅनलमध्ये लढत होत असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

सध्याच्या सत्ताधारी पार्टीकडे वर्षानुवर्षे घोडेगाव ग्रामपंचायतीची सुत्रे आहेत, तरीही गावात म्हणावा तसा विकास झालेला नाही. यावरून ग्रामस्थांमध्ये सध्याच्या सत्ताधारी पार्टीबद्दल प्रचंड असंतोष आहे, असा आरोप गेल्या काही महिन्यांपासून विरोधी व तिसर्‍या आघाडीतर्फे केला जात आहे. विरोधकांच्या याच मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मोठ्या तयारीनिशी आणि ताकदीनिशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या पॅनेलतर्फे सरपंच पदासाठी एकूण तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

सत्ताधारी पॅनलतर्फे यंदा सदस्य पदासाठी तसेच सरपंच पदासाठीही इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे सरपंचपदाचा उमेदवार आणि प्रत्येक वॉर्डातील उमेदवार निवडताना सत्ताधारी पॅनलची मोठी दमछाक झाली. वरीष्ठ पातळीवर घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये इच्छुकांनी "आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, तर थेट अपक्ष अर्ज भरून निवडणूक रिंगणात उतरण्याचा" इशारा दिला होता. इच्छुक उमेदवारांची मनधरणी करताना पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक झाली. परिणामी सरपंच पदासाठी अनेकांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

१२ सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी झाली असून दाखल झालेल्या अर्जांपैकी एकही बाद ठरलेला नाही. आता अर्ज माघारीसाठी शनिवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर १५ सप्टेंबरला निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. तर २६ सप्टेंबरला प्रत्यक्ष मतदान व २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

राजेंद्र भाऊसाहेब दरंदले उर्फ दादा पाटील दरंदले यांनी प्रभाग २ मधे सत्ताधारी पॅनलतर्फे अर्ज दाखल केला आहे. गावातील सामाजिक कार्यात सर्व धर्मियांच्या सण-उत्सवात, तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात दादा पाटील दरंदले सहभागी होतात. गावातील लहानथोरांना प्रिय असे दादा पाटील दरंदले यांचे व्यक्तिमत्त्व आहे.  त्यांच्याविषयी प्रत्येक ग्रामस्थांमध्ये प्रेमाची,  आस्थेची, आपुलकीची व आदराची भावना आहे. त्यांनी सदस्य पदासाठी अर्ज दाखल केल्याने अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एकीकडे विरोधक गावात विकास झाला नसल्याची ओरड करत आहेत. तर दुसरीकडे  सत्ताधारी पार्टीला आपण केलेल्या विकासकामांचे चांगले मार्केटिंग करता न आल्याची भावना सत्ताधारी पार्टीतील काही मंडळी खाजगीत व्यक्त करत आहेत. घोडेगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. ए. डी होडगर हे काम पाहत आहेत.

हे आहेत सरपंचपदाचे उमेदवार - भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या पॅनल तर्फे राजेंद्र देसरडा, सुधीर सोनवणे, स्वतः सचिन देसरडा. आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रणित तिसऱ्या आघाडीतर्फे सुहास गोंटे, सचिन चोरडिया. सध्याच्या सत्ताधारी आघाडीतर्फे - दत्तात्रय ब-हाटे, शरद सोनवणे, राम सोनवणे, संतोष सोनवणे, राजेंद्र सोनवणे, गोपीनाथ हुळहुळे, येळवंडे. वंचित बहुजन आघाडीतर्फे सुधीर वैरागर, अपक्ष उमेदवार - यादववराव लोखंडे, प्रशांत लोंढे, मनोज नहार, प्रवीण वाघमारे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)