Our Feeds

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

कोळपेवाडी दरोड्यात चोरीला गेलेले ३८.६९ लाखांचे दागिने जप्त ! आणखी सहा जण गजाआड !अहमदनगर | DNA Live24 - ऑगस्ट महिन्यात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरोडेखोरांनी एका सराफाचा खून करून धाडसी दरोडा टाकला. या गुन्ह्यात दरोडेखोरांनी सुमारे १ कोटी रुपयांचे दागिने चोरून नेले होते. त्यापैकी ३८ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच फरार असलेल्या आरोपींपैकी ६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच गुन्ह्यात यापूर्वी पाच दरोडेखोरांच्या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पपड्या काळे अद्यापही फरार आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा  अपर पोलीस अधीक्षक जयंत कुमार मीना  यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली फौजदार ज्ञानेश फडतरे, गणेश इंगळे, रोहन खंडागळे, सचिन खामगळ, यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, योगेश गोसावी, पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, संतोष लोंढे, विशाल दळवी, भागिनाथ पंचमुख, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप अण्णा पवार, योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, मन्सूर सय्यद, विनोद मासाळकर, सागर सुलाने, संदीप दरंदले, संदीप घोडके, बबन बेरड, सचिन कोळेकर आदींच्या टीमने ही कामगिरी केली.

पोलिसांच्या पथकाने वर्धा व जालना जिल्ह्यात जाऊन पवन सागर पवार उर्फ पवन पपड्या काळे, शुभम सागर पवार उर्फ शुभम पपड्या काळे व किशोर कांतीलाल भोसले यांना ताब्यात घेतले पवन व शुभम हे पापड्या काळे याचे मुले आहेत. कोळपेवाडी दरोड्यात चोरलेले सोने त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सोनारांकडे विकले होते. त्यामुळे पोलिसांनी अक्षय सुरेश बिरारे, राहुल अशोक बिरारे व अनिल शिवाजी बाबर या सोनारांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ किलो 300 ग्रॅम सोने व १ किलो ८४० ग्रॅम चांदी पोलिसांनी जप्त केली. गुन्ह्यात चोरलेले इतर दागिने त्यांनी वितळले असल्याची कबुली दिली आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

संशय खरा ठरला - कोळपेवाडी गावातील लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक गणेश घाडगे व श्याम घाडगे यांच्यावर गोळीबार करून दरोडेखोरांनी सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले होते. दरोडेखोरांच्या हल्ल्यात गणेश धाडगे हे जागीच ठार झाले तर शाम धाडगे जबर जखमी झाले होते. या घटनेने जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांपुढे तपासाचे खडतर आव्हान होते. वर्धा जिल्ह्यातील खतरनाक दरोडेखोर पपड्या काळे याच्या टोळीने हा गुन्हा केल्याचा दाट संशय नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला होता तपासामध्ये तो खराही ठरला. 

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

एका फौजदाराच्या आणि स्वतःच्या बायकोसह तिघा जणांचा खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा लागलेला खतरनाक दरोडेखोर पपड्या काळे ( जिल्हा वर्धा ) हा स्वतःच्या मुलाच्या लग्नाचे कारण सांगून पॅरोलवर तुरूंगाबाहेर आला होता. मात्र त्यानंतर तो पुन्हा जेलमध्ये गेलाच नव्हता. पपड्याने त्याच्या नातेवाईकांची टोळी तयार करून अशा प्रकारच्या धाडसी दरोड्याचे नियोजन केले. कोळपेवाडी टाकला तशाच प्रकारचा दरोडा तो औरंगाबाद शहरात टाकणार होता. मात्र त्यांनी रेकी केलेले दुकान बंद असल्याने ऐनवेळी तो प्लॅन फिस्कटला. त्यानंतर त्यांनी कोळपेवाडी सराफाचे दुकान निवडून तेथे दरोडा टाकला.

पपड्या काळे अजूनही फरारच - कोळपेवाडी दरोड्या प्रकरणी एसीबीने अटक केलेले आरोपी कोपरगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहेत. मात्र या दरोड्याचा  मास्टरमाइंड असलेला खतरनाक दरोडेखोर पापड्या काळे हा अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असले तरी अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे जिल्‍ह्यातील सराफ व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांमध्ये अजूनही प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)


खबऱ्यांचे नेटवर्क कामाला आले - अलीकडच्या काळात किचकट गुन्ह्यांचा तपास मोबाईलच्या साह्याने करण्यावर पोलिसांचा भर असतो. मात्र कोळपेवाडी दरोडा प्रकरणात दरोडेखोरांनी गुन्हा करण्यापूर्वी तसेच गुन्हा केल्यानंतर मोबाईल वापरलेच नव्हते. पण स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण पोलिस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले यांचे खबऱ्यांचे नेटवर्क तपासात कामाला आले. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली आहे.

(आम्हाला फेसबुक वर लाईक करा)

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »