गणेश भुतकर हत्याकांड प्रकरण - मुख्य आरोपी अविनाश बानकर याच्यासह दोघे जेरबंद


अहमदनगर | DNA Live24 - शनिशिंगणापूर येथील कुख्यात गुंड गणेश भुतकर याच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश बानकर व त्याचा साथीदार गणेश सोनवणे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुंबई येथून ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व अपर पोलिस अधीक्षक जयंतकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांच्या टीमने ही कामगिरी केली.

या टीमची कामगिरी - सहायक फौजदार नानेकर, दिगंबर कारखेले, रविंद्र गाडेकर, संदीप घोडके, दिपक शिंदे, दत्तात्रय गव्हाणे, मनोज गोसावी, रवि सोनटक्के, विजय ठोंबरे, संतोष लोंढे, मेघराज कोल्हे,  देविदास काळे यांच्या टीमने ही कामगिरी केली. 

शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे २० डिसेंबर २०१७ रोजी जुन्या वादातून बानकर व इतर आरोपींनी भुतकर याच्यावर तलवार व कु-हाडीने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी मयत गणेश याचा भाऊ रामेश्वर याने शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात आधी ५ आरोपींना अटक केली आहे. मुख्य मारेकरी अविनाश बानकर व गणेश सोनवणे हे मात्र गेल्या १० महिन्यांपासून फरार होते. 

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

फरार असलेले बानकर व सोनवणे हे परराज्यात पळून गेले होते. तामिळनाडू व मध्य प्रदेशात काही काही दिवस राहिल्यानंतर ते बुलढाणा, नंदूरबार, शेगाव व जालना अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात राहिले. अखेर मुंबईत ते येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. अन् त्यांनी मुंबईत सापळा रचला. 

अविनाश बानकर व त्याचा साथीदार गणेश सोनवणे हे मुंबईत लपले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. पथकाने ७ ते ८ दिवस मुंबईत बानकर याचा शोध घेतला. अखेर शनिवारी रात्री दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. गणेश भूतकरला यमसदनी धाडल्यापासून बानकर व सोनवणे फरार होते. ते एका ठिकाणी राहत नव्हते. एलसीबीचे पोलिस गेले १० महिन्यांपासून या दोघांना शोधत होते.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)
 
त्यामुळे पोलिसांनाही त्याच्या ठिकाणाचा अंदाज येत नव्हता. फरार झाल्यानंतर आरोपी काही दिवस तामीळनाडू राज्यात विविध ठिकाणी राहत होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. ते दोघेही मुंबईत येताच स्थानिक गुन्हे शाखेला त्याची खबर मिळाली. त्यामुळे एलसीबी टीमने मुंबईत सापळा रचून दोघांना पकडले. याच गुन्ह्यात एलसीबीने यापूर्वी पंकज बानकर, अर्जुन महाले, मयूर हरकळ, लखन उर्फ लक्ष्मण नामदेव ढगे यांना अटक केलेली आहे. 

पोलिसांवर संशय - भूतकर हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी सापडत नसल्याने पोलिस तपासावर संशय व्यक्त केला जात होता. मयत भूतकर याच्या कुटुंबियांनी दोन आठवड्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. तर आम्ही आरोपींच्या शोधात असून आरोपी निश्चितच पकडले जातील, असे पोलिसांनी सांगितले होते.

 (आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)