Our Feeds

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

सहा आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश


नगर :
अहमदनगर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह भाजप गटनेते दत्तात्रय कावरे, काँग्रेस नगरसेवक सुभाष लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्तात्रय सप्रे, मनसेचे माजी शहराध्यक्ष गिरीष जाधव, उद्योजक सुमीत कुलकर्णी यांनी बुधवारी (दि.5) शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या द‍ृष्टीने सुरु असलेल्या तयारीत उपनेते अनिल राठोड यांनी विरोधकांना मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खा.संजय राऊत, शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, सभागृह नेते गणेश कवडे आदींसह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. 
येत्या डिसेंबर महिन्यात निवडणुका होत असून प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रामुख्याने शिवसेना व भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु आहे. यात भाजपाने नगरसेवक मनोज दुलम यांना पक्षात सामील करुन घेत शिवसेनेला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर शिवसेनेने आता दत्तात्रय कावरे यांच्या रुपाने भाजपचा गटनेता गळाला लावत धक्क्याची परतफेड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या विरोधी पक्षनेते बोराटे यांनाही शिवबंधन बांधून पुन्हा एकदा शिवसेनेच्या गोटात सामील करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे माळीवाडा भागात शिवसेनेला बळकटी मिळणार आहे. माजी नगरसेवक दत्तात्रय सप्रे यांनीही राष्ट्रवादीची साथ सोडून राठोड यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. माजी नगरसेवक अशोक बडे यांच्या साथीला सप्रे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने बोल्हेगाव, नागापूर भागातही शिवसेनेने कडवे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुभाष लोंढे यांना गळाला लावण्याचे भाजपाचे मनसुबे शिवसेनेने हाणून पाडत लोंढे यांना पुन्हा शिवसेनेत घेतले आहे. प्रभाग 13 मधील लढतीत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने या माध्यमातून केला आहे. शहरात अस्तित्व संपुष्टात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष गिरीष जाधव, युवा उद्योजक सुमीत कुलकर्णी यांनीही शिवबंधन स्वीकारत प्रवेश केला आहे.

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »