मारहाण झालेल्या सफाई कामगाराला १० हजारांची नुकसान भरपाई


अहमदनगर | DNA Live24 - सफाई कामगाराला मारहाण व शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले. मात्र पहिलाच गुन्हा असल्याने १० हजार रुपयांच्या बाँडवर मुक्तता करताना फिर्यादी सफाई कामगाराला १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. मंगेश वसंतराव दिवाणे यांनी काम पाहिले.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

घरासमोर साफसफाई करणारा कामगार मोहन रोकडे याला असिफ आबिद हुसेन सय्यद (रा. भिंगार) याने दमदाटी, अर्वाच्च शिवीगाळ, मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला होता. सन २०१५ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादीत आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केल्याचे नमूद असल्याने गुन्ह्याचा तपास तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील यांनी केला.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे या खटल्यात सहा, तर आरोपीतर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरुन आरोपीला सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करुन धमकावल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले. मात्र चांगल्या वर्तणुकीच्या बाँडवर मुक्त करुन फिर्यादीला १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)