कारवाया करायचे थांबवा, नाहीतर सहकुटुंब आंदोलन करू - रिक्षाचालकांचा इशारा


अहमदनगर | DNA Live24 - शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांवर होणार्‍या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्या वतीने रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा लाऊन निदर्शने केली. तर सध्या चालू असलेली कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार माधुरी आंधळे यांना दिले आहे. कारवाई थांबली नाही तर पुन्हा एकदा सहकुटुंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

निवेदन देताना मंचचे संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे, दिनेश रुद्रे, जालिंदर सोलाट, विष्णू चव्हाण, आदिनाथ गर्जे, आकाश खर्पे, कैलास डरांगे, शुभम गीते, शिवकुमार उपाध्ये, दिपक उपाध्ये, दिपक गायकवाड, राजू अनमल, रवी गुंड, जुनेद शेख, संदिप यादव, विशाल भालेराव, राजेंद्र देठे, गणेश देठे आदिंसह परवानाधारक रिक्षा चालक उपस्थित होते.

शहरामध्ये आठ दिवसांपासून परवानाधारक रिक्षांवर माेटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व प्रवासी नसलेल्या रिक्षांवर कारवाई करून तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस स्टेशनला पकडून ठेवल्या आहेत. यामुळे रिक्षाचालकांचा रोजगार बुडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. 

जेथून रिक्षा पकडून नेल्या तेथे नो पार्किंगचा फलक लावलेला नाही. अनेक प्रवासी गाड्या तेथे थांबत असतात. तरी फक्त रिक्षा चालकांवरच कारवाई का केली जात असल्याचा प्रश्‍न रिक्षाचालक विचारत आहेत. ही कारवाई रिक्षाचालकांना प्रशासन वेठीस धरत असेल तर सोमवार दि. ८ ऑक्टोंबर रोजी शहरातील परवानाधारक रिक्षा चालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा लाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)