‘आघाडी’च्या जागा वाटपाबाबत १४ नोव्हेंबरला ‘कॉंग्रेस’ची मुंबईत बैठक!


नगर : अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाची प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या उद्देशाने आणि आघाडीचा निर्णय निश्चित करण्यासाठी येत्या १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस व निरीक्षक शामराव उमाळकर यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली आहे.
मनपा निवडणुकीसाठी येत्या १३ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. पक्षाकडे उमेदवारी मागणाच्या इच्छुकांनी कागदपत्रांची सर्व पुर्तता करून उमेदवारी अर्ज दाखल करावेत व ही माहिती पक्षाला द्यावी, असेही उमाळकर यांनी सांगितल्याचे शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. निवडणुकीत आघाडीचा निर्णय घेण्यासाठी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल

नेहरू जयंतीचा मुहूर्त साधून बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, निरीक्षक उमाळकर, युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, आ. सुधीर तांबे, सुजय विखे, दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या