अहमदनगर महापालिका निवडणूक - उमेदवारी अर्ज भरायला चौघांनाच एन्ट्री । मोबाईलवरही बंदी


अहमदनगर - महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला येणाऱ्या उमेदवारासहित फक्त चारच लोक निवडणुक निर्णय अधिकारी व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहता येणार आहे. शिवाय या चौघांना स्वत:सोबत भ्रमण दूरध्वनी अर्थात मोबाईल नेता येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या दालनावर नियुक्त केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यां असणार आहे.

अहमनगर महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असून मंगळवार दि. १३ नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत अवघे दोनच अर्ज नेले अाहेत. बुधवारी कोणीही अर्ज नेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रकारे उपलब्ध आहे. मात्र ते सादर करण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष जावे लागणार आहे.

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, म्हणून सहाही ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत. तसेच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे निवडणूक शाखेकडून छायाचित्रण केले जाणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तत्काळ संबंिधतांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.

यापूर्वी उमेदवार निवडणूक अर्ज भरायला जाताना शक्तीप्रदर्शन करीत. मोठ्या गर्दीसह रॅली काढून उमेदवारी अर्ज भरायला जात असत. तसेच निवडणूक अर्ज भरल्याचे फोटो मोबाईलवर काढून ते सोशल मिडियावर व्हायरल केले जात. आता मात्र याला प्रतिबंध असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना दालनात चौघांनाच प्रवेश दिला जाईल, तसेच दालनात मोबाईल नेण्यास प्रतिबंध केला आहे. ही जबाबदारी पोलिसांवर सोपवली आहे.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या