मुरमी दरोड्यातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद- नगर एलसीबीची धाडसी कामगिरी


अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील मुरमी गावात धाडसी दरोडा टाकत सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणारे ५ दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहेत. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या टीमने ही कामगिरी केली. स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केल्यानंतर दोनच दिवसात पीआय पवार यांच्या टीमने ही आणखी एक जबरदस्त कामगिरी केली आहे.

सहिर शेकदम चव्हाण (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर), खंडू रामभाऊ भोसले, विकास रामभाऊ भोसले, राठोड रामू चव्हाण ( बालमटाकळी, ता. शेवगाव) व धर्मा रामभाऊ भोसले (रा. उमापुर, गेवराई, जिल्हा बीड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी सर्वात आधी सहिर चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर इतर साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी इतरांनाही जेरबंद केले.

असा टाकला दरोडा - दरोडेखोरांनी शेवगाव तालुक्यातील मुरमी शिवारात घराबाहेर झोपलेल्या एका दाम्पत्यावर चाकू व सतूरने वार केले होते. दोघांना जबर मारहाण करून 50 हजार रुपयांची रोकड व 54 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. पोलीस अधीक्षक शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या टीमने अवघ्या तीनच दिवसात या दरोड्याच्या गुन्ह्याची उकल केली. आरोपींच्या ताब्यातून 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

या जिगरबाजांची कामगिरी - पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचा पथकातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता हिंगडे, पोलीस नाईक दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, भागिनाथ पंचमुख, सुनील चव्हाण, योगेश सातपुते, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, दिपक शिंदे, रवीकिरण सोनटक्के, रवींद्र कर्डिले व चालक बाळासाहेब भोपळे यांच्या टीमने पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

एलसीबीची सलग दुसरी कामगिरी - तीन दिवसांपूर्वी एलसीबीने स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केले. त्यासाठी एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी स्वतः डमी ग्राहक बनून कारवाईचे नेतृत्व केले. आता एलसीबीने मुरमी येथील धाडसी दरोड्याचा गुन्ह्याची उकल केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या