मुलीची छेड काढणाऱ्याला मुलीच्या वडिलांनी घातल्या गोळ्यानगर : छेडछाडीवरून युवतीच्या पित्याने युवकाच्या घरी जाऊन बंदुकीने गोळ्या घालून त्याची हत्या केली. त्यानंतर डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने गोळ्या घालणारे युवतीचे वडील बेशुद्ध झाले आहेत. त्यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे शिवारात ही घटना घडली.

योगेश एकनाथ जाधव (रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी) असे गोळीबारात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांचे वडील एकनाथ जाधव हे जखमी आहेत. बंदुकीतून गोळ्या घालणारे पोपट गणपत आदमाने (रा. जवखेडे दुमाला, ता. पाथर्डी) हे बेशुद्ध आहेत. त्यांचा भाचा अनिकेत मरकड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू होती. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, जाधव हा आदमाने यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून नोकरी करीत होता. जाधव याच्याकडून मालकाच्या मुलीची छेडछाड केली जात होती. त्यावरून पाथर्डी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हापासून तो फरार होता. त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.22) अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे शुक्रवारपासून जाधव हा त्याच्या कामत शिंगवे येथील घरी येऊन राहू लागला. याची माहिती समजताच युवतीचे वडील व त्यांचे नातेवाईक अनिकेत मरकड असे दोघे शनिवारी दुपारी कामत शिंगवे येथे जाधव याच्या घरी बंदूक व तलवार घेऊन गेले.

जाधव व त्याचे वडील एकनाथ जाधव हे घरीच होते. योगेश दिसताच पोपट आदमने यांनी त्यांच्याकडील बंदूक योगेशच्या दिशेने रोखली व त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मुलाच्या दिशेने बंदूक रोखताच त्याच्या मदतीसाठी एकनाथ जाधव हे धावले. परंतु, आदमाने यांच्यासोबत आलेल्या मरकड याने त्यांच्यावर तलवारीने वार केले. त्यामुळे एकनाथ जाधव हे जखमी झाले. तेथून परत जाताना गोळ्या झाडणार्‍या पोपट आदमाने यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने नगरला हलविण्यात आले. तारकपूर परिसरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे पोलिस फौजफाट्यासह तातडीने कामत शिंगवे येथे दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा सुरू केला. या घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, शेवगावचे पोलिस निरीक्षक राम ढिकले आदी अतिरिक्त कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. न्यायवैद्यक पथकही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे कामत शिंगवे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी अनिकेतला ताब्यात घेतले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या