उमेदवारांना ट्रू वोटर अॅपद्वारेच खर्च सादर करावा लागणार
नगर -
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी केली असून अधिकाधिक मतदान होण्यासाठी मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांना मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांच्या नावाबाबत खातरजमा करण्यासाठी आणि उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची माहिती भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अॅप तयार केले आहे. उमेदवारांना त्यावरच त्यांचा निवडणूक खर्च भरुन देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केले.

          अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०१८ च्या अनुषंगाने श्री. सहारिया यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, राज्य निवडणूक आयोगाचे सहसचिव श्री. झेंडे, निवडणूक निरीक्षक नंदकुमार बेडसे, लक्ष्मण राऊत यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

          यावेळी श्री. सहारिया यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, या निवडणूकीसाठी स्थापन केलेल्या सर्व पथकांचे प्रमुख, आयकर, विक्रीकर, बॅंक, सहकार, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस विभागांचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीसंदर्भातील तयारीचा आढावा घेतला.

          निवडणूकीसाठी एकूण प्रभाग, मतदानकेंद्रांची संख्या, आदर्श मतदान केंद्रे उभारण्यासाठीची झालेली कार्यवाही, रात्रीची गस्त, संशयास्पद बॅंक व्यवहारांवर लक्ष आणि त्यावर कार्यवाही, दारुविक्री आणि विनापरवाना दारु दुकाने उघडी राहण्याच्या घटनांबाबत दक्ष राहण्याच्या आणि अशा प्रकारांवर कडक कार्यवाहीच्या सूचना श्री. सहारिया यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

          उमेदवारांनी त्यांचा दैनंदिन खर्च माहिती केवळ ट्रू अॅपमध्येच भरणे आवश्यक आहे, अन्यथा ते अपात्र ठरु शकतात, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. निवडणूक कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीत कोणताही अनुचित प्रकार सुरु असेल, तर जागरुक नागरिक, स्वयंसेवी संस्था त्याची माहिती कॉप (सिटीझन ऑन पॅट्रोल) या अॅपवर देऊ शकतात. तात्काळ ती माहिती त्या प्रभागातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस यंत्रणेकडे जाऊन संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

          मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणात करुन मतदानाची टक्केवारी वाढेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोशल मीडिया, प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाऊन मतदान प्रक्रियेची माहिती त्यांनी समजावून सांगावी. उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राबाबतची माहिती संबंधित प्रभागातील नागरिकांना कळावी. यासाठी ती ठिकठिकाणी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना श्री. सहारिया यांनी केल्या.

          आयकर आणि विक्रीकर अधिकार्‍यांवर अवैध आणि संशयास्पद रित्या पैशांची वाहतूक, व्यवहार यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यांनी व्यापक प्रमाणात ही मोहीम हाती घ्यावी. कोणत्याही प्रकारे असे व्यवहार होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आणि खासकरुन शहरातील बॅंका, पतसंस्था, सहकारी संस्थांतील व्यवहारांवर लक्ष ठेवावे. मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या कोणत्याही घटनांवर तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

          आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नेमलेल्या पथकांनी  आणि खर्चनियंत्रण पथकांनी उमेदवारांकडून येत असलेल्या माहितीची खातरजमा करावी, पथकांच्या माहितीशी पडताळणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

          कोणत्याही अधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

          यावेळी उपायुक्त (निवडणूक) सुनील पवार यांनी निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीचे सादरीकरण केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या