शिक्षक भरतीची माहिती पोर्टलवर भरानगर : 
नगर जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील सर्व रिक्त जागांची माहिती विहित मुदतीत पोर्टलवर अपलोड करून शिक्षक भरतीची कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी डी. एड., बी. एड. स्टुडंट असोसिएशनने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना यासंबंधी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव गरड, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय भणगे, नेमाजी होले, सोमनाथ ठोंबरे, दत्तात्रय मिसाळ, रमीज शेख, अर्चना शिरसाठ, वैशाली झावरे, सोनम आढाव, पूनम गवांदे, संतोष लवांडे, बालाजी आढाव आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आगामी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावेत व प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी ठराव मंजूर करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्याची गरज आहे. बिंदू नामावली शासनाने तात्काळ अद्ययावत करावी.
जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळेमधील इयत्ता सहावी ते आठवी वर्गासाठीच्या विषय शिक्षकांची (गणित, विज्ञान, भाषा व समाजशास्त्र) सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलवर अपलोड करावेत. जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक खाजगी अनुदानित व विनानुदानित संस्थेतील बिंदू नामावलीसह १०० टक्के रिक्त जागा पवित्र पोर्टलमार्फत भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासन स्तरावरून नवीन शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने जाहीर न केल्यास डी. एड., बी. एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष वैभव गरड यांनी यावेळी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या