महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्‍याचे 'बचत गट' महत्‍वाचे साधन - शालिनीताई विखे



अहमदनगर :

महिला आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करण्‍यासाठी बचत गट हे महत्‍वाचे साधन असुन, बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिला आपल्‍या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्‍याचे महत्‍वाचे काम करतील, असे  प्रतिपादन जिल्‍हा  परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी आज केले.

शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती अभियानांतर्गत  ग्रामीण विकास विभाग व जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्‍या संयुक्‍त विदयमाने आयोजित साई ज्‍योती स्‍वयंसहाय्यता यात्रा - 2019 चे आयोजन करण्‍यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्‍हा  परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्‍या हस्ते करण्‍यात आले. यावेळी त्या बोलत होत्‍या. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या उपाध्‍यक्षा राजश्रीताई घुले, पंचायत समिती सभापती रामदास भोर, शरदराव झोडगे, जिल्‍हा  परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, राजेश परजणे, शिवाजीराव गाडे, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी जगन्‍नाथ भोर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के,  जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक परिक्षित यादव आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती. विखे म्‍हणाल्‍या, महिला बचतगटांच्‍या माध्‍यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. आजही ग्रामीण भागात कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍थेत  महिलांची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची  आहे.  महिला आर्थिकदृष्‍टया  सक्षम झाली तर त्‍या कुटूंबाच्‍या कौंटुबिक अर्थव्‍यवस्‍थेला मदत होते.   बचत गटाच्‍या माध्‍यमातुन आत्‍मविश्‍वास  व आ‍र्थिक स्थिरता मिळण्‍याचे महत्‍वाचे काम केले जाते. महिला बचतगटाचे कर्ज परत फेडीचे प्रमाण अत्‍यंत चांगले असून महिला आर्थिक नियोजनात महत्‍वाची भूमिका बजावत असल्‍याचे सांगून आजही राज्‍यातील महिला टंचाईस्थितीतही सक्षमपणे उभ्‍या आहेत हेच बचतगट चळवळीचे महत्‍वाचे यश असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आजही शिर्डी व ग्रामीण भागात बचतगटाच्‍या माध्‍यमातून सेंद्रीय अगरबत्‍ती तयार करण्‍याचे महत्‍वाचे काम केले जात असल्‍याचा जाणीवपुर्वक उल्लेखही त्यांनी केला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात श्री. माने म्‍हणाले, महिलांनी उत्‍पादीत केलेल्‍या उत्‍पादनाला जगभरात बाजारपेठ आहे. महिलांनी एकत्रित येऊन ब्रॅन्‍डींग तयार करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्‍या संधी व आर्थिक व्‍यवस्‍था सदृढ होण्‍यासाठी महिला चांगले काम करीत आहेत. बचतगटांनी उत्‍पादीत केलेल्‍या उत्‍पादनाला बाजारपेठ उपलब्‍ध करुन देणार असल्‍याचे त्‍यांनी  सांगितले. या महोत्‍सवाला चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

श्रीमती अनुराधा नागवडे, राजश्रीताई घुले, राजेश परजणे यांनीही आपले मनोगत व्‍यक्त केले. आभार प्रकल्‍प संचालक परिक्षित यादव यांनी मानले. यावेळी महिला, नागरिक, मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. हे प्रदर्शन 14 जानेवारीपर्यंत सुरु राहणार असुन शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्‍येने बचत गट प्रदर्शनास भेट देऊन त्‍यांनी उत्‍पादित केलेल्‍या वस्‍तुची खरेदी करावी, असे आवाहन जिल्‍हा  ग्रामीण विकास यंत्रणेने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या