विखे साहेब भाजपात या : राम शिंदेंनी दिली ऑफरनगर :
आदर्श गोपालक व प्रगतशिल पुरस्कार वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. विखेंनी त्यांच्या भाषणात ते कृषीमंत्री असतानाचे किस्से सांगितले. हाच धागा पकडून तुम्हाला कृषिमंत्रिपद हे युती सरकारच्याच काळात मिळाले होते. पुन्हा युतीचे सरकार येणार असल्याची जाणीव तुम्हाला (विखे) झाली असून, तुम्ही परत येणार असाल तर आम्ही विचार करू, असे म्हणत पालकमंत्री राम शिंदे यांनी विखेंना भाजप प्रवेशाची जाहीर ऑफर दिली.
या राजकीय कलगीतुर्‍याने उपस्थित गोपाल-शेतकर्‍यांची चांगलीच करमणूक झाली. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सुरुवातीला अध्यक्षा विखे यांनी पालकमंत्र्यांना टोमणा मारला. शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी नियोजन समितीतून निधी देण्याची मागणी केली. आम्ही तुमच्याकडं एकतर काही मागत नाही. आणि मागितलंच तरी भेटत नाही. मागितलेलंही आम्हाला कोर्टात जाऊन मिळवावं लागत, असं म्हणत राजकीय कुरघोड्यांना सुरुवात केली.
त्यांच्यानंतर अकोल्यातील बियाणे बँक तयार केलेल्या राहीबाई पोपेरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, बियाण्यांच जुनं वाण जपल पाहिजे. तरच आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. राहीबाई यांच्यानंतर बोलण्यास उभे राहिलेल्या राधाकृष्ण विखेंनी राहीबाईंच्या वक्तव्याचा आधार घेत, राहीबाई कोपरे म्हणाल्या की जे जुनं आहे त्याच संवर्धन करा, त्यामुळे आपल्याला पुन्हा जुन्याकडे वळावंच लागेल, असे म्हणत काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा अप्रत्यक्ष दावा केला. विखेंच्या या दाव्याला प्रत्युत्तर देणार नाही ते राम शिंदे कसले? त्यांनीही विखेंना मिळालेले कृषिमंत्रिपद हे युती सरकारच्या काळातीलच असल्याची आठवण करून देत भाजप प्रवेशाची ऑफर दिली.
राम शिंदे म्हणाले, मला वाटलं विरोधीपक्ष नेत्यांच्या बोलण्यात दोनदा, तीनदा वाण आलं. राहून राहून थोरात साहेबांच्या साक्षीने सांगतो. विखे पाटलांकडे अनेक खाते होते. त्यांना मात्र कृषी खात्याचंच ध्यान होत होत. तुम्हाला माहित असल कृषी खात कधी होत त्यांच्याकडं. युतीच्या काळात. युती सरकार पुन्हा येणार याची त्यांना जाणीव झाली आहे.
पालकमंत्री यांनी दिलेल्या ऑफरवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडी केली. अनेक खात्यांचा कारभार असल्याने राम शिंदेंना विखेंचे वक्तव्य नीट लक्षात आले नाही. जुनं ते सोन म्हणजे काही १९९७- ९८ चे पक्ष नाही. तर १३३ वर्षांची परंपरा असलेला पक्ष असे विखेंना म्हणायचे होते, असे सांगत राम शिंदेंनी दिलेल्या एकतर्फी ऑफरला एकतर्फीच धुडकावून लावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या