जलयुक्त शिवार अभियानातील कामे तात्काळ पूर्ण करा - जिल्हाधिकारीअहमदनगर- 
राज्य शासनाचा पथदर्शी उपक्रम असणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानातील उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. आपला जिल्हा कृषीविषयक योजना राबविण्यात अग्रेसर आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातही आपण आघाडीवर असायला पाहिजे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी कामाला लागावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जलयुक्त शिवार अभियान तसेच मागेल त्याला शेततळे योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे-कोकाटे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अभियानातील विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. काही ठिकाणी कामे पूर्ण होऊनही जिओ टॅगिंग झाले नसल्याने राज्य पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही. केवळ तांत्रिक अडचणी न सांगता कामे सुरु करा आणि ती तात्काळ पूर्ण होतील हे पाहा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी सर्व यंत्रणांना दिले. येत्या वीस तारखेपर्यंत मागील वर्षाची सर्व कामे पूर्ण झाली असली पाहिजेत आणि यावर्षीच्या कामांची टक्केवारी ही किमान ८५ टक्के हवी, अशा सूचना त्यांनी विविध यंत्रणांना दिल्या.

या अभियानातील कृषी विभागासह वन, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण, लघुसिंचन-जलसंधारण, लघुसिंचन (जिल्हा परिषद), गटविकास अधिकारी आदी यंत्रणांनी त्यांच्या कामांचा आढावा घेऊन ती कामे मार्गी लावाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अभियानातील कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे, राज्य पातळीवरुन या पथदर्शी कार्यक्रम असणाऱ्या योजनेचा आढावा वेळोवेळी होत असतो. पथदर्शी योजना राबविण्यात जिल्हा अग्रेसर असतो, याची जाणीव ठेवून संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनी ही कामे मार्गी लागतील, याची दक्षता ध्यावी. त्यादृष्टीने यंत्रणांनी कामांचे नियोजन करुन त्याची पूर्तता करावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव तात्काळ दाखल करण्यासही त्यांनी सांगितले. या बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह जलसंधारण, भूजल सर्वेक्षण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या