राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या या पाच शक्यतामुंबई :

महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष आगामी निवडुकीत युती करण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे या शक्यतेला बळ मिळाले आहे.

या आहेत पाच शक्यता ज्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतात. 

१. भाजप हाच शत्रू :
    राज्यात आणि केंद्रात सत्तेत आल्यापासून या दोन्ही पक्षांना संपविण्याचे काम भाजपने सुरु केले असल्याचे दिसते. शतप्रतिशत भाजपचा नाराच त्यांनी दिला. विविध ठिकाणी भाजपने या दोन्ही पक्षांना जेरीस आणले. त्यामुळे सत्तेत आल्यापासून उद्धव आणि राज यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप हा शत्रू मानून हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात.

२. भाजप - शिवसेनेतील वाद:
     भाजप आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस टोकाला जात आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. नुकतेच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी करण्याचे निर्देश दिले. अशा वेळी शिवसेनेलाही तिसऱ्या पक्षाच्या साथीची गरज आहे.

३. मनसेची ढासळलेली लोकप्रियता: 
    वक्तृत्वाच्या बाबतीत राज ठाकरे हे सरस आहेत. त्यांच्या सभांसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असली तरी त्याचे मतात रूपांतर होत नाही. त्यामुळे पक्षाची लोकप्रियता ढासळली आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात असल्याने राज ठाकरे हे एकाकी पडल्याचे चित्र आहे. दुसऱ्या पक्षासोबत युती करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.

४. कार्यकर्त्यांची भावना :
     राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावे ही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. हे दोघे एकत्र आल्यास महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. अनेकदा हे दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आल्याचे दिसले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्यास राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपलाही मोठा दणका बसू शकतो.

५. मुंबई महत्वाची :
     मुंबई आणि मराठी माणूस या दोघांवरच दोन्ही पक्षांचे राजकारण सुरु आहे. भाजप सरकार आल्यानंतर मुंबईतील अनेक महत्वाची कार्यालये गुजरातला हलविण्याचे काम सुरु आहे. मुंबई मनपा निवडणुकीतही शिवसेनेला थोडक्यात जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेने फोडले. मात्र भाजपला धक्का देण्यासाठीच राज आणि उद्धव यांनी ही खेळी केल्याची चर्चा आहे. मुंबई हातची राखायची असेल तर या दोन्ही पक्षांना युतीशिवाय पर्याय नाही हेही तितकेच खरे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या