Our Feeds

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

"आयुष्‍मान भारत योजना" सशक्‍त व समृध्‍द भारतासाठी महत्‍वपूर्ण : पालकमंत्री प्रा.राम शिंदेनगर : DNALive24-

' सर्वांसाठी आरोग्‍य ' या उद्दिष्‍टपूर्तीसोबतच "आयुष्‍मान भारत योजना" देशाला सशक्‍त व समृध्‍द भारताकडे घेऊन जाण्‍यासाठी महत्‍वपूर्ण  ठरेल असा विश्‍वास राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज येथे व्‍यक्‍त केला. सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या कुटूंबियांना आरोग्‍यासाठी ही योजना मोठा आधार ठरेल असेही त्‍यांनी सांगितले.
            
जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी 'आयुष्‍मान भारत' योजनेचा जिल्‍हास्‍तरीय शुभारंभ केला यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. बापूसाहेब गाडे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. प्रकाश सांगळे, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. सुनिल पोखरणा, नियामक मंडळाचे सदस्‍य डॉ. अजित फुंदे, भानुदास बेरड आदि उपस्थित होते.
            
पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून आज शुभारंभ झालेली आयुष्‍मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्‍य योजना अनेक कुटूंबासाठी मोठा आधार ठरणार आहे.  या योजनेमुळे राज्‍यातील 83 लाख 72 हजार कुटूंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्‍मान भारत योजनेसोबतच राज्‍य शासनाची महात्‍मा ज्‍योतिबा फुले जन आरोग्‍य योजना एकत्रितपणे राबविण्‍यात येणार आहे. सन 2011 मध्‍ये करण्‍यात आलेल्‍या सामाजिक , आथिंक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83 लाख 72 हजार कुटुंबाची आयुष्‍मान भारत योजनेसाठी निवड करण्‍यात आली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून दरवर्षी 5 लाख रुपयापर्यतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. सर्वसामान्‍य कुटूंबासाठी अत्‍यंत सुलभ योजना असून या योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन प्रा. शिंदे यांनी यावेळी केले.
            
झारखंड रांची येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्‍मान भारत योजनेचा राष्‍ट्रव्‍यापी शुभारंभ केला.  या सोहळयाचे थेट प्रक्षेपण जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय येथे करण्‍यात आले. पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते जिल्‍हयातील लाभार्थ्‍यांना ई-कार्डचे वाटप करण्‍यात आले.
            
खासदार दिलीप गांधी म्‍हणाले, केंद्र व राज्‍य सरकारने सामान्‍य माणसाच्‍या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्‍यासाठी अनेक योजना सुरु केल्‍या. आयुष्‍मान भारत योजनेच्‍या माध्‍यमातून सर्वसामान्‍य माणसाला आधार देण्‍याचे महत्‍वाचे कार्य होईल. सर्वसामान्‍य माणसाच्‍या घरात आजार असेल तर  त्‍याला चिंता सतावते. या योजनेमुळे ही चिंता दूर होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
            
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी म्‍हणाले, आयुष्‍मान भारत ही देशातील सर्वात मोठी आरोग्‍य योजना आहे. या योजनेत लाभार्थी कुटूंबाला 5 लाखापर्यत विमा कवच मिळणार आहे.  सर्वसामान्‍य कुटूंबासाठी ही योजना वरदान ठरेल. समाजातील सर्वसामान्‍य घटकापर्यंत ही योजना पोहचविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासन प्रयत्‍नशील राहील असे त्‍यांनी सांगितले.
            
जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ.बापूसाहेब गाडे म्‍हणाले, अहमदनगर जिल्‍हयात ग्रामीण भागात 2 लाख 68 हजार  आणि शहरी भागात 51 हजार 844 लाभार्थीना असे एकूण 3 लाख 20 हजार लाभार्थींना  आयुष्‍मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत लाभार्थीना निशुल्‍क लाभ मिळणार आहे. सांधेरोपन शस्‍त्रक्रिया, कर्करोग, मानसिक आजार यासह 1 हजार 300 आजाराचा या योजनेत समावेश करण्‍यात  आला असून  5 लाख रुपयापर्यतचे उपचार देशात कुठेही घेता येतील.
            
नियामक मंडळाचे सदस्‍य डॉ. अजित फुंदे म्‍हणाले, गरीब रुग्‍णांना निशुल्‍क गुणात्‍मक वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्‍मान भारत योजना सुरु केली आहे.  या योजने अंतर्गत प्रत्‍येक कुटूंबाला दरवर्षी  5 लाख रुपयापर्यतचे उपचार मोफत मिळणार असल्‍याने सर्वसामान्‍य कुटुंबासाठी ही योजना मोठा आधार ठरणार असल्‍याचे सांगून त्‍यांनी  आयुष्‍मान भारत योजनेबाबत सविस्‍तर माहिती दिली.  
            
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरा यांनी केले. तर आभार अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी मानले.

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

DNA Live24

100 किलो बियांपासून बनविला 'बिजानन' गणेशनगर : DNALive24-
आई वडील व नातेवाईक नसलेली मुले घरगुती व कौटुंबिक सुखाला व जिव्हाळयाला पारखी होतात, म्हणून येथील सर्वाधिक पारितोषिके विजेता हरहुन्नरी कलाकार डॉ. अमोल बागूल यांनी सामाजिक जाणीव जपत अश्या मुलांना घरातल्या सुरक्षा व आपुलकीचे वातावरण जगता यावे याकरिता या गणेशोत्सवात स्वतः च्या घरात सुमारे तीस अनाथ, वंचित मुले सांभाळून त्यांना 'माझं घर' या शब्दाचा अनुभव दिला. अन या मुलांबरोबर 100 किलो बियांपासून  'बिजानन' गणेश देखील बनविला.

महात्मा फुले छात्रालयासह सुमारे पाच संस्थातील तीस मुलांनीच स्वतःच्या हातानेच शाडू माती गणेशमूर्ती बनविली व मुलांनीच रंगवून मुलांनीच गणेशस्थापना केली. दररोज सकाळ संध्याकाळी आरती तसेच विविध मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेत मुले सहभागी होतात. योगसाधना, सूर्यनमस्कार आदि दैनंदिन कामे करतात. वैद्यकीय तपासणी, पुस्तक वाचन, टीव्ही-रेडियो-वर्तमानपत्रे वाचन, विविध खेळ, मनोरंजक खेळ, बासरीवादन, तबलावादन, गायन आदि दैनंदिन उपक्रमांच्या माध्यमातून मुले बागूल यांच्या घरी रमुन गेली.

पाहुन्यासारखे न राहता घरातील स्वातंत्र्य अनुभवता यावे म्हणून बागूल यांनी त्यांचा अभ्यास घेण्याबरोबरच दमणाऱ्या मुलांचे हातपाय-डोके ही दाबले. त्यांच्यासाठी चपला-बूटं, नवे कपड़े, शैक्षणिक साहित्य घेताना त्यांची पसंतीही जपली. 'आज काय ख़ाणार?' असे विचारून त्यांची न खाल्लेल्या न पाहिलेल्या खाद्य पदार्थांची देखील हौस पुरविली.

घरगुती गणेशोत्सव पर्यावरणपुरक आरास करताना मुलांनी बागूल यांच्या मदतीने १० बाय १० फुटांच्या कागदावर भव्य गणपती चितारुन विविध फळ-फूल झाडांच्या सुमारे १५० प्रकारच्या सुमारे १०० किलो बियांपासून 'बिजानन'गणेशाची बियांची रांगोळीवजा कलाकृती देखील तयार केली. विसर्जनाच्या दिवशी ह्या बिया मिरवणूक मार्गावर गणेशभक्तांना वितरित केल्या जाणार आहेत.

या उपक्रमात डॉ. बागूल यांना गणेश कोरडे, मंगेश गराडे,  शैलेश थोरात, किरण घालमे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.