History of Maharashtra

DNA Live24

Latest Post


अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी (ता. कर्जत) प्रकरणाशी आपला संबंध नसताना पोलिसांनी चौकशीला बोलावून मला अटक केली. जातीयवादामुळेच आपल्याला या गुन्ह्यात गोवले. आता न्यायालयाने आता न्याय द्यावा, अशी विनंती आरोपी संतोष भवाळ याने गुरुवारी न्यायालयात केली. त्याच्या वतीने बचाव पक्षाला सहा साक्षीदार तपासायचे असल्याचे सांगून, त्यांची यादी आरोपीचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी न्यायालयात दिली. यादीत विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे.

कोपर्डी खटल्यात आरोपींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. बुधवारी मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याचा जबाब नोंदवला. त्याने सर्व आरोपांचा इन्कार केला. गुरुवारी आरोपी भवाळचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानेही त्याच्यावर ठेवलेल्या सर्व आरोपांचा इन्कार केला. साक्षीदारांनी घटनास्थळी व गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपीला पाहिले, त्याचा पाठलागही केला, याबद्दल आपल्याला काहीच माहित नसल्याचे भवाळ म्हणाला.

पीडितेच्या मैत्रिणीने मुख्य आरोपी शिंदे, भवाळ व भैलुमे यांनी पीडितेची दोन दिवस छेड काढल्याचे सांगितले होते. भवाळने मात्र हे म्हणणे खोटे असल्याचे म्हटले. आरोपीसोबत मोटारसायकवरुन पीडितेचा पाठलाग केल्याचा, तिला धमकावल्याचाही त्याने इन्कार केला. आरोपी शिंदेच्या घरात पोलिसांना मोबाईल व अश्लील सीडीज मिळाल्याबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे भवाळ जबाबात म्हणाला.

आपल्या दातांचे नमुने घेतले नव्हते, असे त्याने सांगितले. मला दिवसभर चौकशीकरिता बोलावून बसवून ठेवले. चौकशीनंतर सोडून देण्याचे आश्वासन दिले. पण, नंतर काहीही कारण न सांगता अटक केली, असे तो म्हणाला. पोलिसांनी आपला मोबाईल व सिमकार्ड जप्त केल्याचे, तसेच नमूद केलेला मोबाईल क्रमांकही आपलाच असल्याचे त्याने मान्य केले. गुन्ह्यात आपला काहीच सहभाग नसल्याचे तो म्हणाला.

पुराव्यादाखल सीडी - आरोपी भवाळ याच्यातर्फे वकील अॅड. खोपडे यांनी न्यायालयात दोन व्हिडिओ सीडी जमा केल्या. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशी देण्याचे आश्वासन दिल्याचा पुरावा एका सीडीत तर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मंत्री विनोद तावडे यांनी "आम्ही आरोपींच्या विरोधात असे पुरावे तयार केले आहेत, की आरोपींची सुटका होऊच शकत नाही' असे भाष्य आहे. 

साक्षीदारांची यादी - अॅड. खोपडे यांनी बचाव पक्षातर्फे दिलेल्या साक्षीदारांच्या यादीत रवींद्र चव्हाण, अॅड. उज्ज्वल निकम (विशेष सरकारी वकील), डॉ. राजेंद्र थोरात (स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स), डॉ. उदय निरगुडकर (मराठी वृत्तवाहिनीचे संपादक), नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे डायरेक्टर व जिल्हाधिकारी अभय महाजन यांचा समावेश आहे. या यादीवर न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे मागवले आहे. अॅड. निकम हे शुक्रवारी सकाळी युक्तीवाद करतील. त्यानंतर न्यायालय निर्णय देईल.


अहमदनगर । DNA Live24 - प्रेस क्लबच्या वतीने संवेदनशिलता ठेवून वारकर्‍यांच्या आरोग्य सेवेविषयी केले जाणारे कार्य कौतुकास्पद आहे. इतरांना चांगले दिसावे म्हणून आचारणातील शिस्त अंगी बाळगायची नसते. तर दुसऱ्यांना त्रास होवू नये यासाठी नियमांचे पालन करण्यात खरा आनंद असतो. नैतिक मुल्यांचे आचरण व पालन केल्यास समाजात सुख व समाधान राहिल, असे प्रतिपादन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.

नगर शहर प्रेस क्लबच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या पुढाकाराने पंढरी यात्रेसाठी निघालेल्या देवगड दिंडीतील वारकऱ्यांना औषधी किटचे वितरण भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते केले. इमामपूर घाट पायथ्यानजिक दिंडीच्या विश्रांती स्थळावर हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दिंडी सोहळ्याचे बाळू महाराज, महेश देशपांडे, दत्ता इंगळे, साहित्यिक चंद्रकांत पालवे, वाजिद शेख, महेश कांबळे, शाहिद शेख, सौरभ गायकवाड, रोहित वाळके, लैलेश बारगजे, संजय सावंत, सुशील थोरात आदिंसह पत्रकार, छायाचित्रकार उपस्थित होते.

भास्करगिरी महाराज म्हणाले, दिंडीत 90 टक्के शेतकरी वर्ग असतो. घर-दार सोडून वारकरी विठ्ठल भक्तीत तल्लीन होवून विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी जातात. प्रापंचिक विवंचना असतेच. सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चर्चा सुरु आहे. शेतकरी अडचणीत असून, त्याला कर्जमुक्त करण्याचे बळ सरकारला मिळावे व सरकारची तिजोरीही भरल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगत, कर्ज आहे म्हणून आत्महत्या कोणीही करु नये असे आवाहन त्यांनी केले. बायका मुलांचा आयुष्याचा उन्हाळा होतो, याची जाणीव ठेवायला हवी.

संकट आले तरी त्याला सामोरे जायला हवे. तेच बळ वारीच्या साधनेतून व संत विचारातून मिळत असल्याचेही भास्करगिरी महाराज म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना महेश देशपाडे यांनी मस्तक हे पायावरी! वारकरी संतांच्या!! ही नगर प्रेस क्लबच्या पत्रकारांची वारकऱ्यांविषयी भावना असल्याचे सांगत, प्रेस क्लबतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. भास्करगिरी महाराज यांच्याकडे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या गजरात प्रेस क्लबच्या वतीने प्राथमिक उपचाराचे औषधी किट सुपूर्द करण्यात आले.

अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन मी तिचा खून केला नाही. या गुन्ह्यात कारण नसताना माझे नाव गोवण्यात आले. पोलिसांनी जातीयवादातून मला अटक केली, असा कांगावा मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पु शिंदे याने केला. बुधवारी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. आपल्याला कोणतेही साक्षीदार तपासायचे नसल्याचे त्याने सांगितले.

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत सरकार पक्षाने एकूण ३१ साक्षीदार तपासले. बुधवारी दुपारी मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पु शिंदे याचा जबाब नोंदवण्यात आला. खटल्यात आपल्यासमोर सादर झालेले सर्व साक्षीपुरावे समजल्याचे त्याने मान्य केले.

काही साक्षीदारांनी शिंदे याला घटनास्थळावरुन पळताना पाहिले, त्याचा पाठलाग केला, त्यावेळी त्याची चप्पल बाजरीच्या शेतात पडली, तो आईच्या हाताला हिसका देवून पळाल्याचे सांगितले होते. पप्पू शिंदेने मात्र जबाबात या गोष्टी खोट्या असल्याचे सांगितले. वैद्यकीय व दंतवैद्यकीय तपासणी केल्याचा त्याने इन्कार केला.

घटनेच्या वेळी अंगावर असलेले व नंतर पोलिसांनी जप्त केलेलेे कपड्यांबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे शिंदे म्हणाला. पोलिसांनी जप्त केलेली मोटारसायकल आपली नसल्याचे, ती विकत घेतल्याचे खोटे असल्याचे त्याने सांगितले. तसेच आपल्या घरातून पोलिसांनी मोबाईल व अश्लील सीडीज जप्त केल्याबद्दलही माहिती नसल्याचे त्याने नमूद केले.

पोलिसांनी त्याच्या गळ्यातील माळ जप्त केल्याविषयी सांगताना आपण माळच घालत नसल्याचे तो म्हणाला. स्वत:ची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी झालेली नसल्याचे शिंदेने सांगितले. अटकेच्या कारवाई खोटी असल्याचे तो म्हणाला. तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे हा मावसभाऊ असल्याचे व तो कोपर्डीतच रहात असल्याचे मात्र शिंदेने मान्य केले. 

ज्या क्रमांकाचे सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले, तेही आपलेच असल्याचे त्याने नमूद केले. मोबाईलमध्ये अश्लील क्लीप्स असल्याबद्दल, तसेच स्वत:चा रक्तगट आपल्याला माहिती नसल्याचे शिंदेने जबाबात सांगितले.

सायकल जप्ती - मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या वतीने काम पाहणाऱ्या विधी सेवा प्राधिकरणचे अॅड. योहान मकासरे यांनी पीडितेच्या सायकलच्या जप्तीबद्दल एक अर्ज न्यायालयात सादर केला. दोषारोपपत्रामध्ये सायकल जप्त केलेली तारिख नमूद आहे. एका वर्तमानपत्रात मात्र नंतरच्या तारखेला या सायकलचे छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहे. त्यावरुन सायकल जप्त केल्याच्या तारखेबद्दल त्यांचा आक्षेप अाहे. या अर्जासोबत अॅड. मकासरे यांनी वर्तमानपत्राचे कात्रणही जोडले.

क्रीडा प्रमाणपत्र - पीडित मुलगी खो-खोपटू असल्याचे साक्षीपुराव्यांत समोर आले आहे. मात्र, अॅड. मकासरे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात त्याबद्दल माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यात मात्र पीडितेचा तसा काहीच उल्लेख नसल्याचे समोर आले, असे अॅड. मकासरे यांचे म्हणणे आहे. ही कागदपत्रे त्यांनी न्यायालयात सादर केली.


शेवगाव । DNA Live24 - एकाच कुटुंबातील चौघा जणांची निघृण हत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. विद्या कॉलनीत राहणाऱ्या हरवणे कुटुंबियांतील चौघांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने हत्याकांड झाल्याचे दिसत असले तरी खरे कारण वेगळेच असल्याचा संशय आहे. हत्या करण्याची पद्धत पाहून पोलिसही चकीत झाले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा शेवगावात तळ ठोकून अाहेत. 

लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीला असलेले अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय ५८), त्यांची पत्नी सुनंदा अप्पासाहेब हरवणे (४८), मुलगी स्नेहल (१९) व मुलगा मकरंद (१४) अशी हत्या झालेल्या चौघांची नावे आहेत. रविवारी सकाळी त्यांचा दूधवाला आला असता आवाज देवूनही कोणी बाहेर आले नाही. घराचा दरवाजा उघडाच असल्याने दूधवाल्याने डोकावले असता हत्याकांड दृष्टीस पडले.

ही घटना समजताच शेवगावचे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक रंजकुमार शर्मा, श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक निरीक्षक संदीप पाटील, फौजदार राजकुमार हिंगोले यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

अप्पासाहेब हरवणे लष्करी सेवेतून निवृत्त झालेले होते. सध्या भूमी अभिलेश विभागात होते. शेवगावजवळच्या वडुले येथील ते रहिवासी होते. काही वर्षांपूर्वी शेवगावात आले होते. विद्यानगर एरिगेशन कॉलनी दाट लोकवस्तीचा भाग आहे. तरीही हा प्रकार सकाळपर्यंत कोणाच्या लक्षात आला नाही. पोलिस आल्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांना हत्याकांडाची माहिती समजली. 

धारदार शस्त्राने चौघांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बेडरुममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त होते. दरवाजाचा कडीकोयंडा किंवा कुलूपही तोडलेले नव्हते. घराबाहेर एक पांढऱ्या रंगाचा हातमोजा पोलिसांना सापडला. श्वानपथकाने घरापासून रस्त्यापर्यत माग काढला. न्यायवैद्यकीय विभाग व ठसेतज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी सुनंदा हरवणे यांच्या भावाने शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पीआय दिलीप पवार हे करीत आहेत.

चोरीचा बनाव - हरवणे कुटुंबियांची हत्या करुन घरातील सामानाची उचकापाचक केल्यामुळे प्रथमदर्शनी हा चोरीचा प्रकार वाटतो. पण सुनंदा यांच्या अंगावरील दागिने व अप्पासाहेब यांच्या खिशातील पैसे तसेच होते. कपाटाची उचकापाचक करुन कपडे अस्ताव्यस्त केलेले होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्याकांड झाल्याचे भासवले आहे. घराचा दरवाजा उघडाच होता. हत्येपूर्वी चौघांना गुंगीचे औषध दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

ती वाचली - सुनंदा हरवणे यांची सख्खी बहिण विद्यानगर कॉलनीतच रहाते. त्यांनाही सकाळी हत्याकांडाची माहिती मिळाली. अप्पासाहेब व कुटुंबियांचे स्वभाव सरळमार्गी होते. हरवणे कुटुंबियांचे कोणाशीही वैमनस्य नव्हते. त्यांची एक मुलगी शिक्षणासाठी परगावी होती. त्यामुळे ती वाचली. या हत्याकांडाचे नेमके कारण काय, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

आज शेवगाव बंद - चौघांच्या मृतदेहांचा शवविच्छेदनपूर्व पंचनामा करुन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी हे मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रवाना केले. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह शेवगावात आलेले नव्हते. चौघांवरही त्यांच्या मूळ गावी वडुले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या हत्याकांडाच्या निषेधार्थ शेवगाव ग्रामस्थांनी सोमवारी शेवगाव बंदची हाक दिली आहे.

कसून तपास सुरू - हत्याकांडाच्या गुन्ह्याचा पोलिस दल शर्थीचे तपास करीत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा शेवगावात तळ ठाेकून आहेत. शेवगाव पोलिस, उपअधीक्षक, एलसीबीची दोन पथके, व श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मिळून एकूण ५ तपास पथके तपासात आहेत. खुनाचे कारण शोधून आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

शेवगावातील हरवणे कुटुंबियांची हत्या झाल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी.


सोनई । DNA Live24 - नेवासे तालुक्यातील सोनईच्या माजी सरंपंचाच्या चोरी गेलेल्या बुलेटचा तपास करताना पोलिसांनी सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या मुद्देमालाची एकूण किंमत जवळपास ६ लाख रुपये आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी चोरलेल्या गाड्या सोनई, राहुरी व नागापूर एमआयडीसी परिसरातून चोरल्याची कबुली दिली आहे. सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

सोनई गावचे माजी सरपंच राजेंद्र बोरुडे यांची सिल्व्हर रंगाची बुलेट गेल्या आठवड्यात त्यांच्या राहत्या घरासमोरुन चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. याप्रकरणी भाऊसाहेब मारुती निकम (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) व सुजित नवनाथ पवार (रा. खडांबे, ता. राहुरी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी चोरलेली बुलेट पोलिसांच्या स्वाधीन केली.

मात्र, निकम याच्याविरुद्ध नगरमध्येही मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आणखी काही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसंानी त्यांच्याकडून एकूण सहा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सहायक निरीक्षक शिंदे यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे, विजय भिंगारदिवे, गणेश धोत्रे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये ४ बुलेटचा समावेश आहे. ही गाडी आवडत असल्यामुहे चोरल्याचे निकमने पोलिसांना सांगितले आहे. 

घरासमोर लावलेल्या, कंपाऊंड-ग्रीलच्या आत बंदिस्त असलेल्या बुलेट गेटचे कुलूप तोडून पळवल्याचेही निकमने सांगितले. तर काही मोटारसायकली लॉक तोडून चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस त्याची अधिक चौकशी करीत आहेत. सध्या निकम पोलिस कोठडीत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सोनई पोलिस करीत अाहेत.


अहमदनगर । DNA Live24 - प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र उर्फ जितू मोहनलाल भाटिया यांच्या खून प्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने त्यांच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी शनिवारी दुपारी हा निकाल दिला. हेमा उर्फ दिव्या जितेंद्र भाटिया (३२, रा. तारकपूर) व प्रदीप उर्फ शप्पू जनार्दन कोकाटे (२४, रा. सिद्धार्थनगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रदीपला पिस्तुल पुरवणाऱ्या विक्रम उर्फ गोट्या किशोर बेरड याला ४ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे.

२७ एप्रिल २०१४ रोजी गंजबाजारात सायंकाळच्या सुमारास गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून जितू भाटिया यांचा खून झाला. त्यामुळे अख्खे शहर हादरले. व्यापारी वर्गात दहशत पसरली. तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन येत होते. कोतवालीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक ढेकणे यांच्या पथकांनी तपास केला. काही दिवसांनी पोलिसांनी सिद्धार्थनगरमधून प्रदीपला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत मोबाईल व पिस्तुल पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्रदीपच्या अटकेनंतर गुन्ह्याच्या तपासाला कलाटणी मिळाली. भाटिया यांच्या खुनामागे खंडणी नव्हे, तर प्रेमसंबंधातील अडथळा, हे मुख्य कारण असल्याचे निष्पन्न झाले. प्रदीप काेकाटेचे जितू भाटिया यांची पत्नी हेमासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी हेमालाही अटक केली. तिनेही गुन्ह्याची कबुली दिली. आधार कार्ड केंद्रावर तिची प्रदीपसोबत आेळख झाली होती. याच ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमसंबंधांत झाले. त्यात जितू भाटिया यांचा अडथळा येत असल्याने दोघांनी जितू भाटिया यांचा कट रचून काटा काढला. गुन्हा करण्यासाठी प्रदीपला विक्रम बेरडने गावठी पिस्तुल पुरवले होते.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करुन या गुन्ह्याचा सर्व तपास पूर्ण केला. न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनिल एम. घोडके यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण तब्बल ४१ साक्षीदार तपासले. त्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नोडल ऑफिसर व तपासी अधिकारी हनपुडे, अशोक ढेकणे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. खटल्यातील साक्षीपुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेसह विविध कलमान्वये शिक्षा व आर्थिक दंड ठोठावला.


अहमदनगर । DNA Live24 - तोफखाना पोलिसांनी संशयास्पद वाहनांचा वीस मिनिटे थरारक पाठलाग करुन आशा टॉकीज चौकात वाहने अडवली. त्यातून तब्बल ६४३ किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला. उस्मानाबादहून आणलेला हा गांजा नगरमध्ये वितरित होणार होता. जवळपास १ काेटी रुपयांचा गांजा, १७ लाखांची दोन चारचाकी वाहने, रोकड असा एकूण १ कोटी १४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या टीमने शनिवारी सकाळी ही कामगिरी केली.

पोलिस निरीक्षक मानगावकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय इस्सर, कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे, संजय काळे, धिरज अभंग, भास्कर गायकवाड, महिला कॉन्स्टेबल छाया आढाव, हारुण शेख हे औरंगाबाद रस्त्यावर सरकारी जीपमधून गस्त घालत होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल सनी पॅलेससमोर त्यांना औरंगाबादच्या दिशेने एक इनोव्हा (क्र. एमएच २४ व्ही १६९९) व पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप (क्र. एमएच १७ एजे ६९४३) भरधाव वेगाने येताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला.

पण, दोन्ही वाहने वेगाने नगरच्या दिशेने पुढे गेली. तोफखाना पोलिसांनी सरकारी जीपमधून दोन्ही वाहनांचा पाठलाग केला. इनोव्हा व बोलेरो वाहने एकापाठोपाठ वेगाने पोलिस अधीक्षक चौकातून पुढे गेली. पोलिसांचा पाठलाग सुरूच होता. दोन्ही वाहनांनी हायवे सोडून शहरात प्रवेश केला. सुमारे वीस मिनिटे हा पाठशिवणीचा खेळ चालला. ६ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी आशा टॉकीज चौकामध्ये दोन्ही वाहनांना अडवले. इनोव्हा कारमध्ये एक पुरुष व महिला, तर बोलेरो जीपमध्ये दोन पुरुष व एक महिला होते.

गाड्यांमध्ये मागच्या बाजूला राखाडी रंगाची काही पाकिटे रचलेली दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता गाडीत बसलेल्या लोकांनी पाकिटांमध्ये गांजा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल, वाहने ताब्यात घेतली. इनोव्हा कारमध्ये संदीप दिलीप अनभुले (२८, घुमरी, कर्जत) व सीमा राजू पंचारिया (४६, कासारदुमाला, संगमनेर), तर बोलेरोमध्ये सागर भिमाजी कदम (२८, आश्वी, संगमनेर), गणेश निवृत्ती लोणारी (जोर्वे, संगमनेर) व शोभा कृष्णा कोकाटे (नालेगाव, नगर) यांना अटक केली.

सीमा पंचारिया हिच्याकडून ८६ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली. इनोव्हा कारमध्ये १५०, तर बोलेरो जीपमध्ये १३६ राखाडी रंगाची चौकोनी पाकिटे होती. प्रत्येक पाकिट अडीच किलोग्राम वजनाचे होते. त्यात सुकलेला गांजा मिळून आला. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने मुद्देमाल मोजला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्टच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मानगावकर हे करीत आहेत.


अहमदनगर । DNA Live24 - बालवयात डोळ्याची दृष्टी गेली. कमला मेहता अंध विद्यालयात वसतिगृहात राहून शिकले. सेंट झेव्हिअर्समध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. अनेक अडचणींवर मात करुन वर्ष २०१५ व २०१६ मध्ये २ वेळा युपीएससी  उत्तीर्ण झाले. डोळस नसूनही कधी अंधत्वाचे भांडवल, सहानुभूती मिळवली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासू वापर व स्वतःची सर्वोच्च इच्छाशक्ती असेल तर युपीएससीमध्ये यश सहज शक्य आहे, असे प्रतिपादन देशातील पहिल्या महिला आयएएस प्रांजल पाटील यांनी केले.

सावेडीतील माऊली सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लोकनायक अण्णा हजारे यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित साद प्रेरणेशी, संवाद दुर्दम्य आशावादाशी, उपक्रमाअंतर्गत प्रांजल पाटील यांच्या संवादाचे आयोजन केले होते. स्नेहालय परिवाराच्या दिव्यांग पुनर्वसनातील स्वयंसेवी संस्था अनामप्रेम, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, सक्षम स्पर्धा परीक्षा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अंध असूनही युपीएससी परीक्षेत यश कसे मिळवायचे याबाबत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाई च्या मार्गदर्शन प्रांजल पाटील यांनी केले. यावेळी प्रांजल पाटील यांचा नागरी सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आणि अनामप्रेमच्या प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगतात प्रांजल पुढे म्हणाल्या, युपीएससीसाठी जॉज या संगणक सोफ्टवेअरचा पुरेपूर उपयोग केला. वयाच्या ६ व्या वर्षी एका डोळ्याला अंधत्व आले. दोनच वर्षांनी म्हणजे वयाच्या ८ व्या वर्षी दुसऱ्या डोळ्याची दृष्टी गेली.

पण, आई-वडीलांच्या पाठिंब्यामुळे शिक्षण घेतले. राज्यशास्त्र विषयात एमए, एमफील केले. जेएनयु विश्वमहाविद्यालयात युपीएससीचा खूप अभ्यास केला. इंटरनेटचा अधिकाधिक वापर स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी नक्की होतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तसेच स्नेहालय प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांनी पाटील यांना स्पर्धा परीक्षेबाबत अनेक प्रश्न विचारले. पाटील यांनी त्यांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अजय धोपावकर यांनी केले.

धोपावकर यांनी अनामप्रेमची प्रकाशवाटा व प्रकाशवाणी या मासिकांची दिव्यांग पुनर्वसनात गरज, सरकारी नोकऱ्यामध्ये दिव्यांग अनुशेष भरतीची मागणी, अपंग प्रमाणपत्राची नवीन पद्धत, विधिमंडळात दिव्यांगाना प्रतिनिधित्व, याबाबत विचार मांडले. यावेळी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी स्पर्धा परीक्षा हा देशसेवेचा उत्तम मार्ग असल्याचे सांगितले. सक्षम अकादमीचे डॉ. भरत करडक यांनी अनामप्रेमच्या रीडर-रायटर क्लबची यावेळी घोषणा केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अविनाश बुधवंत हे होते. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचे अध्यक्ष सुजित माने, अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने ,उपाध्यक्ष नाना भोरे, सचिव सुभाष शिंदे, स्नेहालयचे सुवालाल शिंगवी, संजय हरकचंद गुगळे, नंदेश शिंदे, प्रकाशवाटा व प्रकाशवाणी विभागाच्या अनुजा कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन राधिका मुळे यांनी केले. आभार नंदेश शिंदे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वितेसाठी नितीन वावरे, मीना भिंगारदिवे, उमेश पंडूरे, प्रदीप कुंभार, भारती सोनवणे, सचिन गारदे यांनी परिश्रम घेतले.

प्रांजल महाराष्ट्राचा कोहिनूर - प्रांजल पाटील यांच्या आई व वडिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अत्यंत भावूक वातावरणात प्रांजल यांच्या आईने अंध प्रांजलचा संघर्ष सांगितला. यामुळे धडधाकट तरुण मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेत  यश मिळवणे खूप सोपे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. यावेळी प्रांजल माझ्या पोटचा हिरा आहे, असे त्या म्हणाल्या. त्यावर सूत्रसंचालिका मुळे यांनी प्रांजल महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा असल्याचे म्हणताच संपूर्ण सभागृहाने उभे राहून प्रांजल यांच्या माता-पित्यांना अभिवादन केले.


अहमदनगर । DNA Live24 - घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने पालकांसोबत शेतात घाम गाळून कष्ट उपसले. घरकामातही मदत केली. हे करताना स्वत:च्या अभ्यासाकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले. परिणामी तो नुसता पासच नाही झाला, तर दहावीच्या परीक्षेत केंद्रात प्रथम येण्याचा मानही त्याने पटकावला. हे आदर्श उदाहरण आहे नगर तालुक्यातील बहिरवाडी (वाकी वस्ती) येथील राहुल सुखदेव दारकुंडे या दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे.

राहुलने शेतकरी कुटुंबात जन्माला येवून इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५.०२ टक्के गुण मिळवले आहेत. तेा जेऊर बायजाबाईचे केंद्रात प्रथम आला आहे. राहुलने हे यश निव्वळ वैयक्तिक कठोर मेहनतीच्या बळावर मिळवले. घरची आर्थीक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याची राहुलला सुरुवातीपासून पूर्वकल्पना होती. त्यामुळे त्याने कोठेही खासगी शिकवणी लावली नाही.

आई-वडिलही फारशे शिकलेले नसल्यामुळे घरी अभ्यास घ्यायलाही कुणी नाही. तरीही परिस्थिती जाण असल्याने राहुलने पालकांना शेतीच्या कामात मदत केली. आईलासुद्धा घरकामात मदत केली. दहावीच्या परीक्षेतील दैदिप्यमान कामगिरीमुळे राहुलने इतर विद्यार्थ्यांसमोर वेगळाच आदर्श ठेवला आहे. त्याबद्दल त्याच्या आदर्श विद्यालयाच्या वतीने त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. 

या सत्कार सोहळ्याला बहिरवाडी गावचे सरपंच विलास काळे, भास्कर नाना आव्हाड, संदीप आव्हाड,  सीताराम दारकुंडे, संजय येवले, विघ्नहर्ता मित्र मंडळाचे (घोडेगाव, ता. नेवासे) अध्यक्ष दीपक इखे, उपाअध्यक्ष गणेश जाधव  व बहिरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विघ्नहर्ता मित्र मंडळाने राहुलच्या पुढील शिक्षणाकरिता लागणाऱ्या पुस्तके व गणवेशाचा खर्च उचलला आहे.


अहमदनगर । DNA Live24 - घराची, इमारतीची, कार्यालय, बांधकाम साईट्सच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवतात. असा एक वॉचमनच घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा टोळीप्रमुख निघाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुुरूवारी दुपारी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडलेल्या चोरट्यांच्या टोळीमुळे हा प्रकार उजेडात आलेला आहे. सावेडीत एका इमारतीच्या बांधकामावर वॉचमन म्हणून काम करताना त्याने शेजारच्या इमारतींमध्ये रेकी केली. अन् मुलांसह साथीदारांच्या टोळीने लागोपाठ दोन ठिकाणी घरफोड्या करुन लाखोंचा ऐवज लांबवला होता.

पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, घरफोड्या करणारे काही संशयित आरोपी सावेडी परिसरात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने सावेडीतील गुलमोहोर रोड परिसरात सापळा रचला. गुलमोहोर रोडवर दोन संशयित व्यक्ती बजाज पल्सर मोटारसायकलवर फिरत असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्यांना हटकले असता त्यांनी वेगाने धूम ठोकली.

पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले व चौकशी केली. त्यांनी त्यांची नावे मनोज गोरख मांजरे (वय १९) व काळू बाबुलाल जाधव (१९, दोघेही रा. निर्मलनगर, पाईपलाईन रोड) अशी सांगितली. अधिक विचारपूस केली असता त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मोटारसायकल आपल्या छोट्या भावाने त्याच्या मित्रासह चोरल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच गुलमोहोर रोड परिसरात एका घरामध्ये आठवडाभरापूर्वी घरफोडी केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी दोघांसह त्याच्या लहान भावाचा शोध सुरू केला. त्यांच्या घरी गेले असता पोलिसांना मनोजचे वडील गोरख मारुती मांजरे (वय ४४, रा. निर्मलनगर) भेटले. तर छोटा भाऊ मात्र पोलिसांना पाहून पळून गेला. पोलिसांनी गोरख मांजरे यांची चौकशी केली असता ते कोहिनूर मंगल कार्यालयामागे एका बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. एक आठवड्यापूर्वी याच परिसरात दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. चौकशीअंती गोरख मांजरेनेच मुलांसह हे गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी मनोज मांजरे, काळू जाधव व गोरख मांजरे यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या हवाली केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, उमेश खेडकर, पोलिस नाईक विशाल अमृते, दत्ता हिंगडे, संदीप पवार, रावसाहेब हुसळे, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, प्रमोद जाधव, संदीप घोडके, कॉन्स्टेबल योगेश सातपुते, चालक सचिन कोळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या सर्व आरोपींची अधिक चौकशी आता तोफखाना पोलिस करीत आहेत.


अहमदनगर । DNA Live24 - तालुक्यातील हिवरे बाजार येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी सकाळी न्युजर्सी अमेरिका येथून किशोर गोरे यांच्याशी हिवरे बाजार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे मुलांनी दोन तास गाेरे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सरपंच पोपटराव पवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच पालकही उपस्थित होते.

साडेदहा ते साडेबारा, असा सुमारे दोन तास विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे झाली. यात अमेरिका व भारतातील शाळा, विद्यार्थी, पर्यावरण, शिस्त, जीवन कौशल्ये, शाळेत पालकांचा सहभाग, राहणीमान यांसह विविध बाबतीत असणारे साम्य व फरक विद्यार्थ्यांना समजले. नवनवीन गोष्टींचा परिचय झाला. गोरे यांनी कौटुंबिक बाबींसह सर्व बाबींना उजाळा दिला.

या संवादामुळे विद्यार्थ्यांना गोरे यांनी मी तुमच्यातीलच एक असल्याची जाणीव करून दिली. काही विद्यार्थ्यांनी गोरे यांना स्वरचित कविता एेकवल्या. त्यांनीही टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिवरे बाजारला ग्लोबल हाऊसमध्ये येण्याचे निमंत्रण विद्यार्थ्यांनी गोरे यांना दिले. तर अमेरिकेला येण्याचे निमंत्रण गोरे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

पोपटराव पवार यांच्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व आपल्यासमोर असल्यामुळे हिवरे बाजारच्या शाळेतील विद्यार्थी भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांशी, ग्रामस्थांशी, निरनिराळ्या विषयावर संवाद करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यामुळे आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अमेरिकेची सहल करता आल्याचे पोपटराव पवार यांनी सांगून आभार मानले.


घोडेगाव । DNA Live24 - नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात शनिवारी शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. चांगल्या कांद्यालाही कमी भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. शनिवारी किमान ४०० गाड्या कांदा आवक झाला. ही आजपर्यंतची विक्रमी आवक ठरली. चार तास लिलाव बंद पडले होते. अखेरिस सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी चर्चा करुन सर्वसमावेशक तोडगा काढला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

सकाळी साडे अकरा वाजता बंद पाडलेला लिलाव चार तासानंतर दुपारी साडे तीन वाजता पुन्हा सुरु होऊन साधारण सहा वाजता संपला. शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याचे समजताच सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण शिंदे, फौजदार ससाणे व सहकारी बाजारात दाखल झाले. शेवगाव, नगरमधूनही अतिरिक्त फाैजफाटा दाखल झाला. एपीआय किरण शिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांना भाव परवडत नाही, त्यांनी माल देऊ नका. परंतू कायदा हातात घेऊन लिलाव बंद पाडणे, धिंगाणा घालणे, वाहनाच्या हवा सोडणे, बेकायदेशीर असल्याचे सांगून तसे केल्यास कारवाईचा इशारा दिला.

एक नंबर कांद्याला नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असताना व इतर मार्केटच्या तुलनेत भाव चांगला मिळूनही काही शेतकरी ओरड करून लिलाव बंद पाडत आहेत. शेतकऱ्यांची गैर सोय होऊ देणार नाही. लिलाव पुन्हा सुरु होतील. योग्य मालाचा रास्त भाव देऊ असे बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे म्हणाले. 

शेतकऱ्यांना आज मिळणारा भाव परवडत नाही. किमान हजार बाराशे प्रति क्विंटल बाजार असावा. पण हवामान, शेतकऱ्यांची गरज, बाजारात मालाची आवक, मालाच्या प्रतिनुसार भाव मिळत आहे. इतर मार्केटच्या तुलनेत बाजारभाव कमी निघाला. म्हणून ओरड होतेय. पण काय करणार, अशी हताश भावना रांजणगाव येथील शेतकरी एकनाथ चौधरी यांनी व्यक्त केली.

बाजार समितीत लिलाव चालू झाल्यानंतर एक नंबरला  आठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल भाव देऊनही ठराविक शेतकरी लिलाव बंद पाडत आहेत. बंद नंतरही पाचशे रुपयापासून प्रतवारी नुसार नऊशे पर्यंत कांदा विकला गेला असल्याचे अडत असोसिएशनच्या वतीने सुदाम तागड, राजेंद्र ब-हाटे, संतोष सोनवणे यांनी सांगितले.

लंडन l DNA Live24-
चॅम्पियन्स ट्रॉफीतील ‘करो या मरो’च्या लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करुन उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 192 धावांच्या लक्ष्याचा भारतीय फलंदाजांनी 8 गडी आणि 72 चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला.

टीम इंडियाने फलंदाजीची चांगली सुरुवात केली, मात्र 23 धावसंख्या असताना सलामीवीर रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. मात्र शिखर धवन आणि त्याच्या साथीने आलेल्या कर्णधार विराट कोहलीने महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताला विजयाच्या जवळ नेलं.

शिखर धवनने 83 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 78 धावा ठोकल्या. तर विराटने नाबाद 76 धावा करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. युवराज सिंहने नाबाद 23 धावा केल्या.

फलंदाजीची दमदार सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची मात्र या सामन्यात साफ निराशा झाली. क्निन्टॉन डी कॉक आणि हाशिम अमलाने 76 धावांची सलामी दिली खरी, पण त्यासाठी त्यांना 105 चेंडू खर्ची घालण्याची वेळ आली.

कारण भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकी सलामीवीरांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. त्यानंतर क्निन्टॉन डी कॉक आणि फॅफ ड्यू प्लेसीने सात षटकांत 40 धावांची भागीदारी रचली. पण रवींद्र जाडेजाने डी कॉकचा त्रिफळा उडवला आणि तिथून दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी उडाली. दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे नऊ फलंदाज अवघ्या 76 धावांत माघारी परतले.

उपांत्य सामन्यात भारताची गाठ बांगलादेशसोबत होणार आहे. बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेल्या विजयासोबतच उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. 15 जूनला हा सामना खेळवला जाईल.


नवी दिल्ली l DNA Live24-
जीएसटी परिषदेने आज झालेल्या बैठकीत 66 वस्तूंवरच्या करात बदल करून ते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरच्या सुट्ट्या भागांवरील कर 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात संगणक प्रिंटरवर 28 ऐवजी 18, काजूवर 18 ऐवजी 12, इन्सुलिनवर 12 ऐवजी 5 टक्के कर आकारण्यात येणार आहे.

दरम्यान देशभरात गाजत असलेला सॅनिटरी नॅपकिनच्या करात मात्र कपात करण्यात आलेली नाही.

सिनेमाचे तिकीट स्वस्त होणार

100 रुपयांवरील सर्व सिनेमा तिकिटांवर 28 टक्के, तर 100 रुपयांखालील तिकिटांवर 18 टक्के कर लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी सर्व प्रकारच्या तिकिटांवर समान कर ठेवण्यात आला होता.

सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक भाषेतील सिनेमांना करातून सवलत देण्यात आलेली आहे. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ही पद्धत बंद होईल. मात्र राज्य सरकारची इच्छा असेल तर सबसिडी दिली जाऊ शकते. मात्र त्याने फार फायदा होणार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 100 रुपयांच्या आत सिनेमाचं तिकीट असेल तर ते स्वस्तात मिळेल.

 जीएसटीचे जुने आणि नवीन दर

संगणक प्रिंटरवर 28 टक्क्यांऐवजी आता 18 टक्केकाजूवरचा कर 18 वरून 12 टक्के100 रुपयांवरील सर्व सिनेमा तिकिटांवर 28 टक्के, तर 100 रुपयांखालील तिकिटांवर 18 टक्के करटेलिकॉम क्षेत्रावरील 18 टक्के कर कायमकटलरीवरील कर 18 टक्क्यांवरून 12 टक्केइन्सुलिनवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्केस्कूल बॅगवरील कर 28 टक्क्यांवरून 18 टक्केअगरबत्तीवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के

मुंबई l DNA Live24-
शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. कारण सुकाणू समिती आणि सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य करण्यात आली आहे.

सुकाणू समितीचे सदस्य आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार मंत्रिगटाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी शेतकरी संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

या बाबतीतले निकष ठरवण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल. यामध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही असतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

शिवसेनेचे दिवाकर रावतेही सरकारच्या समितीमध्ये होते. या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा काढल्यामुळे सरकारचे आभार मानले. तसंच शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी असेल, असंही सांगितलं.

अधिवेशनापूर्वी कर्जमाफी न झाल्यास पुन्हा आंदोलन : राजू शेट्टी

सरकारने सकारात्मक चर्चा करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्वाचे निर्णय घेतल्याने 13 जूनला होणारा रोल रोको आणि आंदोलन मागे घेत असल्याचं सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केलं.

सरकारने 31 ऑक्टोबरपासून अल्पभूधारकांना कर्जमाफी देण्याचं मान्य केलं होतं. मात्र त्याबाबत आक्रमक भूमिका घेत आजपासूनच कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. त्यामुळे आजपासून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळेल, अशी हमी सरकारने दिल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं.

सरकारच्या तिजोरीत करदात्यांचा पैसा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फायदा धनदांडग्यांना होऊ नये, यासाठी शेतकरी संघटनाही प्रयत्न करतील, असंही राजू शेट्टींनी सांगितलं.

मात्र अधिवेशनापूर्वी म्हणजे 25 जुलैपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही, तर पुन्हा आंदोलन केलं जाईल, असंही राजू शेट्टी म्हणाले.

स्वामिनाथन आयोगाच्या बाबातीत मुख्यमंत्री सर्वपक्षीयांसोबत पंतप्रधानांना भेटायला जातील. शेतकऱ्यांना कायम सरकारवर अवलंबून रहावं लागू नये, यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी गरजेच्या आहेत. त्यामुळे त्याबाबत आग्रही राहू, असंही राजू शेट्टींनी सांगितलं.  शेतकऱ्यांना कायम सरकारवर अवलंबून रहायला लागू नये यासाठी भूमिका मागणार

रघुनाथ दादा पाटील

सकाळपासून सरकारशी सकारात्मक चर्चा झाली. सरसकट कर्जमाफीचा मुख्य आग्रह होता. त्यानंतर कसलीही अटतट न ठेवता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाने छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं.

शेतकरी आंदोलनामुळे नागरिकांना त्रास झाला. मात्र त्याचं फलित चांगलं मिळालं. त्यामुळे उद्याचं आंदोलन मागे घेत असल्याचंही रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं.

रक्तदान करुन सरकारच्या निर्णयाचं स्वागत : बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनीही सरकारचे आभार मानले. यापुढच्या आंदोलनात रक्त वाहणार होतं. मात्र आता रक्तदान करुन या निर्णयाचं स्वागत करु, असं बच्चू कडू म्हणाले.

पुणतांबा गावाचे आभार

दरम्यान ज्या पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली, त्या पुणतांबा गावाचे सर्वांनी आभार मानले. शिवाय शेतकरी आंदोलनाचा यापुढचा लढा असाच सुरु राहिल, असा निर्धारही व्यक्त केला.

नगर 1 DNA Live24 - नगरच्या मातीत तयार झालेला 'भॉ'हा मराठी सिनेमा लवकरच गोवा मराठी चित्रपट महोत्सवात दाखवली जाणार आहे. या सिनेमहोत्सवात सचिन - अ बिलियन ड्रीम्स, कासव, व्हेन्टिलेटर, चि व चिसौका, या सिनेमांसोबत नगरच्या भॉ ला  झळकण्याचा सन्मान मिळाला आहेे. त्यामुळे नगरकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

येत्या १६, १७ व १८ जून रोजी पणजी गोवामध्ये, गोवा मराठी फेस्टिवल साजरा होत आहे. यंदा या फेस्टिवलचे दहावे वर्षे आहे. अतिशय नावाजलेल्या, प्रत्येक वर्षीच्या प्रेक्षक समीक्षकांनी गौरविलेल्या, वेगळ्या धाटनीच्या, मराठी सिनेमा सम्रृध्द करणारे सिनेमे या महोत्सवामध्ये दाखवल्या जातात.यावर्षी दशक्रिया, सचिन, व्हेन्टिलेटर, एफयु, नदी वाहते, चि व चि.सौ.का, कासव, सायकल, डॉ. रखमाबाई या फिल्म्ससोबत नगरची भॉ सुद्धा दाखवली जाणार आहे.

या फेस्टिवलमध्ये भॉ ची निवड होण्याचं कारण म्हणजे फिल्मची वेगळी धाटणी असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. भॉ हा  आजपर्यंतच्या मराठी सिनेमा इतिहासातील पहिलाच फाऊंड फुटेज फॉरमॅटवर आधारीत सिनेमा आहे. शिवाय फिल्ममध्ये 5 ते 7 मिनिटांचे दृष्य आहेत. शिवाय सिनेमाचे संगीत हे सीन सुरू असताना जागीच रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. या आणी अशा अनेक दर्जेदार प्रयोगामुळे गोवा मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शनासाठी भॉची निवड झाली आहे.

गोवा सिनेमा फेस्टिवलचे यंदाचे प्रमुख आकर्षण सचिन तेंडुलकर, ह्रितिक रोशन, प्रियंका चोप्रा हे आहेत. ह्रितिक रोशनचा 'ह्रुदयांतर' व प्रियंका चोप्रा च्या 'क्या रे  रास्कला' या मराठी सिनेमाचे प्रिमियर शोही या महोत्सवात होणार आहेत. याअगोदर कोल्हापूर फिल्म फेस्टिवल मध्ये भॉ या फिल्मला बेस्ट अक्टर (संकर्षण कराडे) व स्पेशल ज्युरी अवॉर्ड अशी दोन पारितोषिके मिळालेली अाहेत. संस्कृती कलादर्पण, मुम्बई येथे बेस्ट आर्ट डिरेक्शनचे नॉमिनेशन होते.

विरोज मुनोत यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली. तर संकर्षण कराडे, शाश्वती पिंपळीकर, हृषीकेश वाम्बुरकर हे प्रमुख भूमिकेत असून किशोर चौघुले, समीर चौघुले हे सहाय्यक भूमिकेत आहेत. भॉ सिनेमाचे अर्धे चित्रीकरण राजगड किल्याच्या पायथ्याच्या जंगलात झाले असून अर्धा भाग नगर शहरातील पाईपलाइन रोड, दारवेकर वाडा, प्रोफ़ेसर चौक, केडगाव स्मशानभूमी, सावेडी नाका, न्यू आर्ट्स कॉलेज याठिकाणी झालेले आहे. येत्या सप्टेंबर मध्ये भॉ प्रदर्शित होणार आहे.

टीम DNA Live24 -  ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत रहा...2:30 AM - अहमदनगर : नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे टोल नाक्यावर शेतीमाल व दुधाचे टँकर अडवण्याचा प्रयत्न. पोलिसांनी मात्र वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. शिवसेनेचे काही पदाधिकारी पोलिसांनी घेतले ताब्यात.

2:30 AM - अहमदनगर : आंदोलकांचा गनिमी कावा रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज़्ज. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग, गावागावात पोलिस पथके तैनात. महाराष्ट्र बंद शांततेत करण्याचे आवाहन.

1:10 AM - अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव चौफुल्यावर (शनिचौकात) दुधाचा टँकरच्या (एमएच १६ एवाय ८०८८) काचा फोडल्या. टँकरमधील दूध रस्त्यावर सांडले. चालक फरार. सोनई व एमआयडीसी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल. हल्लेखाेर शेतकरी नव्हे, तर सोनई परिसरातील स्थानिक असल्याची सूत्रांनी माहिती.

12:05 AM - शेतकरी संपाचा सलग चौथा दिवस. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकऱ्यांचे समाधान नाहीच. संपावर ठाम, सोमवारी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन.

10:00 PM - अहमदनगर : राहुरी खुुर्द येथील गोटुंबे आखाडा येथे दुधाचा टँकर पेटवला. पोलिस घटनास्थळी.


अहमदनगर । DNA Live24 - गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपरात शेतकरी संपाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण, महाराष्ट्रातील शेतकरी प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता हा संप मागे घेणे, म्हणजे पोरकटपणाच आहे, असे मत संजीव भोर यांनी व्यक्त केले आहे. कृषी मुल्य आयोग असो वा हमीभाव कायदा, मंत्रीमंडळाची बैठक घेवुन तातडीने अद्यादेश का काढला नाही, असा सवाल शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी संपामध्ये सहभागी होत पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे ३१ मे आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी भोर यांना अटक केली होती. पारनेर पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर संजीव भोर व रामदास घावटे यांनी जामीन नाकारले. तसेच पारनेर तुरूंगातच उपोषण चालु केले होते. मात्र, शनिवारी संप मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर सभापती प्रशांत गायकवाड व शंकर नगरे यांच्या हस्ते लिंबु पाणी घेवुन भोर यांनी उपोषण मागे घेतले.

शेतमालाला रास्त हमीभाव मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, या मागण्यांसाठी चाललेले आंदोलन सरकार व प्रशासन दडपशाही मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप भोर यांनी केला आहे. दुसरीकडे या आंदोलनातील शेतकऱ्यांना अटक करून त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. ही बाब निंदनीय असल्याचे सांगुन सरकार व प्रशासनाला यांचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही संजीव भोर यांनी दिला आहे.

सरकार केवळ बोलघेवडेपणा व वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत हे आंदोलन चालु ठेवण्यात असल्याचे भोर यांनी सांगितले आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड शंकर नगरे भुमीपुत्र जिल्हाध्यक्ष अनिल देठे, अरूण ठाणगे, प्रशांत औटी, बाबा भोर, संदिप संसारे, अॅड. कावरे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.


बर्मिंगहॅम । DNA Live24 - टीम इंडियाच्या टॉप ४ फलंदाजांच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजयश्री संपादन केली. भारताने आधी बॅटिंग करताना निर्धारित ४८ षटकांत ३ बाद ३१९ धावा काढल्या. तब्बल १२५ धावांनी पाकिस्तानचा अक्षरश: धुव्वा उडवत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी दिली.

भारताकडून रोहित शर्माने ९१, शिखर धवनने ६८, कर्णधार विराट कोहलीने नाबाद ८१, युवराज सिंगने ५३, तर हार्दिक पंड्याने नाबाद २० धावा काढल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ दोनदा थांबला. नंतर सामना प्रत्येकी ४८ षटकांचा झाला. पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमाने ४८ षटकांत ३२४ धावांचे लक्ष्य देण्यात आले. ३ बाद ३१९ धावा हा आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताचा सर्वोच्च स्कोअर ठरला. याआधी पाकविरुद्ध ७ बाद ३०० हा सर्वोच्च स्कोअर होता. टीम इंडियाने तो २०१५ च्या विश्वचषकात केला होता.

पाकिस्तानविरुद्ध ३९ वर्षांत प्रथमच वनडेत भारताच्या टॉप ४ फलंदाजांनी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढल्या. एकूणच वनडेत सर्व संघाविरुद्ध मिळून तिसऱ्यांदा भारताच्या टॉप-४ फलंदाजांनी ५०+ चा स्कोअर केला. उर्वरित दोन वेळेस इंग्लंडविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली. भारताकडून हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांत ३ षटकार ठोकले.

१० षटकांत ११७ धावा - भारताने अखेरच्या १० षटकांत ११७ धावा तर अखेरच्या ४ षटकांत ७२ धावा ठोकल्या. अखेरच्या षटकात २३ धावा काढल्या. इमान वसीमच्या या षटकात हार्दिक पंड्याने पहिल्या तीन चेंडूंवर ३ षटकार मारले. चौथा चेंडू निर्धाव पडला. पाचव्या चेंडूवर एक धाव तर अखेरच्या चेंडूवर कोहलीने चौकार मारला. पंड्याने अवघ्या ६ चेंडूंत नाबाद २० धावा ठोकल्या.

झेड सुरक्षा भेदून चोरट्यांनी दाखवली हात की सफाई

जळगाव । DNA Live24 - मुंबईहून पठाणकोट एक्स्प्रेसने जळगावला येत असताना राज्याचे विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांचे दीड लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरट्यांनी चोरले. हा प्रकार शनिवारी रात्री घडला. तर चोरी झाल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले. अ‍ॅड. निकम यांना असलेली झेड प्लस सुरक्षा भेदून चोरट्यांनी ही हात की सफाई दाखवली आहे.

अॅड. निकम हे दादर-अमृतसर पठाणकोट एक्सप्रेसने जळगावला जात होते. रेल्वेच्या ए-वन या वातानुकुलित बोगीतील 38 क्रमाकांचे सीट शनिवारी रात्री अॅड. निकमांसाठी आरक्षित केलेले होते. शनिवारी रात्री ते दादर रेल्वे स्थानकावरून या एक्स्प्रेसमध्ये बसले. त्यांच्यासोबत मुंबईचा सुरक्षा ताफादेखील होता. कल्याण स्टेशन सोडल्यानंतर अ‍ॅड. निकम त्यांच्या सीटवर झोपले.

पहाटे सहा वाजेच्या सुमारास पाचोरा स्टेशन आल्यावर त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांचे दीड लाख रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आले. या घटनेमुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुरक्षा रक्षकही झोपले - अॅड. निकम यांच्या सुरक्षा बंदोबस्ताला असलेल्या झेड प्लस दर्जाच्या सुरक्षा ताफ्यातील रक्षकही रात्री झोपलेले होते. मनमाड येथून त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा ताफा बदलला. त्यानंतर तेही झोपले होते. त्यामुळे दोन्ही मोबाईल हे कल्याण ते मनमाड दरम्यान चोरीस गेले की मनमाड ते पाचोरा दरम्यान हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सकाळी साडेसहा वाजता जळगाव स्थानकावर उतरल्यावर अ‍ॅड. निकम यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुध्द भुसावळला गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget